नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दि. ७ ते ११ मार्चदरम्यान राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट येणार आहे, असे भाकित मुंबई वेधशाळेने (Mumbai Observatory) वर्तवले आहे. राज्यात उष्णतेची तीव्र लाट पसरणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Department) उष्णतेच्या लाटेवेळी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे.
काय करू नये?
१. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंडपेये घेऊ नका.
३. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये.
६. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
लहान-मोठ्यांना हवामानाचा त्रास
बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेताना लहान मुलांपासून (Children) मोठ्यांनाही त्रास होत आहे. दुपारच्या वाढत्या उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. दुपारी उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सायंकाळी सहानंतरच लोक घराबाहेर पडतात. दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे पक्षी आणि प्राण्यांनाही तळपत्या उष्णतेचा फटका बसत आहे.
काय करावे?
- पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
- घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
- दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
- सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.
- हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
- प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करा.
- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा धाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
- पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
- तसेच बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
- गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.