नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा (Summer) चटका चांगलाच बसला. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तीव्र असणार, अशी चर्चा सुरू झाली असताना वातावरणातील विचित्र बदलाचा अनुभव नाशिककरांना (Nashik) गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. सकाळी थंडी व दुपारी असह्य उन्हाळा यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
गुरुवारी नाशिकमध्ये एका दिवसात तापमानात सात अंशांनी घसरण झाली. निफाडच्या (Niphad) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ४.३ अंश सेल्सिअस इतके न्यूनतम तापमान नोंदवले गेले. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे नाशिक शहर आणि निफाड भागात थंडीचा कडाका जाणवला. नाशिककरांना हुडहुडी भरली. पहाटे फिरण्यासाठी निघणाऱ्या नागरिकांना उबदार कपडे घालावे लागले.
राज्यात सर्वात कमी १०.५ अंश सेल्सिअस तापमान आज अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे तर सर्वात जास्त ३८ अंश सेल्सिअस तापमान लोहगाव येथे नोंदवण्यात आले. नाशिकचे कमाल तापमान ३६ अंशांवर पोहोचले आहे. गुरुवारी नाशिकमध्ये १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र आज तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन ते १२.४ अंशांवर पोहोचले. घसरलेल्या तापमानामुळे नाशिककरांना पुन्हा थंडीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.
राज्यात सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत, पण नाशिक शहरासह जिल्ह्याच्या (District) काही भागातील नागरिकांना थंडीचा कडाका सोसावा लागत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. राज्यभर उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. नाशिक, निफाडमध्ये दिवसा उन्हाच्या झळांची तीव्रता जाणवत होती. नंतर कमाल तापमान दोन अंशांनी घसरले आणि किमान तापमानाचा पाराही वेगाने खाली घसरला.
जळगाव जिल्ह्याचे (Jalgaon District) कमाल तापमान ३३ अंश तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस आहे. जळगावातही सकाळी आणि रात्री थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. जम्मू-काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जळगावसह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला आहे.
गारठा आणखी दोन दिवस
उत्तर भारतातून येणारे थंड वारे नाशिक, विदर्भासह राज्यातील २३ जिल्ह्यांत येत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात अचानक थंडी वाढली आहे. दीड महिन्यांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात पूर्वीय दिशेने दमट आणि आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येत होता. थंडीची लाट एक-दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.