नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पुढील दोन दिवसांत मोसमी पाऊस (Monsson Rain) केरळात (Kerala) दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मोसमी पाऊस २५ मेपर्यंत केरळात तर मुंबईत (Mumbai) साधारण १ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते, यापूर्वी, हवामान खात्याने आपल्या मागील अंदाजात २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतू त्यात ४ दिवस कमी अधिक होतील असेही त्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती अनुकूल आहे आणि मान्सून वेळापत्रकानुसार पुढे सरकत आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर, आम्ही भाकित केल्याप्रमाणे, तो २५ मे पर्यंत केरळच्या किनाऱ्यावर पोहोचू शकतो.
दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोव्यालगत (Gao) असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सध्या स्थिर आहे. परिणामी महाराष्ट्रातील (Maharashtra) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नाशकात पावसाची विश्रांती
गेल्या १७ दिवसांपासून पावसाळ्यासारखा पडणाऱ्या पावसाने आज शहरात विश्रांती घेतली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या सात मेपासून पाऊस सुरु झाला होता. रोज दुपारी नाही तर रात्री तो बरसत होता. वीज पडून काही जणांचा मृत्यू झाला. झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले होते. आजही दिवसभर आभाळ होते. मात्र, पाऊस पडल्याचे वृत्त नाही. अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीसमोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून, आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढला होता. शनिवार दि. ३१ मेपर्यन्त पावसाचे वातावरण असले तरी गुरुवार दि.२९ मेपासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा. परंतु कपाशी व टोमॅटो लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी कळविले आहे.