मुंबई | Mumbai
दरवर्षी मे महिन्यात (May Month) उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत असतो. परंतु, यंदा मात्र हवामानात बदल झाला असून, मे महिन्यात सर्वत्र अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) जोरदार बरसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मुक्काम (Maharashtra Weather) वाढला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) १९ ते २५ मे दरम्यान महाराष्ट्रासाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ५० ते ६० किमी/तास वेगाने वाहणारे वारे अपेक्षित आहेत. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केले आहेत. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, तसेच विदर्भातील नागपूर आणि अमरावती येथेही मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 18, 2025
दरम्यान, आयएमडीने मच्छीमारांना १९ ते २५ मे दरम्यान दक्षिण कोकण-गोवा किनारपट्टीवर समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कमी पातळीवरील भागात पाणी साचणे, वाहतूक कोंडी, रेल्वे आणि बस सेवांमध्ये विलंब आणि काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. तसेच या पावसामुळे शेतीपिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना (Farmer) खरीप हंगामापूर्वी जमीन तयार करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल.
राज्यातील कुठल्या भागात कधी अवकाळी बरसणार?
राज्यभरात मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण राज्याला ‘यलो’ अलर्ट दिला आहे. कोकण परिसरात सोमवार (दि. १९) रोजी आणि मंगळवारी (दि. २०) रोजी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवार व बुधवारी (दि. २१) रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस; तर कोकणात रविवारी (दि. १८) रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अंदमानात मान्सूनचे आगमन
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले असून, या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करण्याची शक्यता आहे.