नागपूर | Nagpur
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर, महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर हे पहिलेच अधिवेशन होत आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. महायुतीचे विजयानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील विदर्भासह जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार, राज्यातील वाढती गुन्हेगारीसह इतर अनेक बाबींबर सरकारकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे.
यासोबतच, कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन महायुती सरकारचे पहिले अधिवेशन असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, या अधिवेशनात जवळपास २० विधेयके सादर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांसोबत चर्चेची तयारी असून त्यांच्या मुद्यांना उत्तरे देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या विषयांवर सभागृहात सविस्तर उत्तर देणार. आमची चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षाने सभागृहात चर्चा करावी, आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही.. लोकसभेप्रमाणे पळ काढून मीडियासमोर बोलण्याचे काम करू नका, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.