अहिल्यानगर (प्रतिनिधी)
ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य झाले नाही, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार आता राज्य सरकारने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत.
ग्रामविकास विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात मुदत संपलेल्या ७५३ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांना कारभार दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावगाड्यांच्या चाव्या पुन्हा अधिकाऱ्यांच्या खिशात जाणार आहेत.
या नव्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) किंवा इतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करू शकतील.
प्रशासकाची नियुक्ती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) वैध राहील. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९) मधील कलम १८२ व कलम १५१ नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. या निर्णयामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांनाच मुदतवाढ देण्यात आली होती. ही सहा महिन्यांची मुदत ऑगस्टअखेर संपुष्टात आली. त्यामुळे शासनाने मंगळवारी हे आदेश काढले. ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने फेब्रुवारी २०२६ ला जिल्हा परिषद प्रशासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समितीही कार्यरत होती. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या सार्श्वभूमीवर या व्यवस्थेला व्यापक आर्थिक अधिकार नसले, तरी अत्यावश्यक सेवांवरील खर्चासाठी व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती.
या ग्रामपंचायतीत नवे प्रशासक येणार
मुदत संपलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, पाथर्डी ७८, शेवगाव ४८, कर्जत ५६, जामखेड ४७, पारनेर ८८, श्रीगोंदा ५९ : एकूण ७६५.




