Tuesday, January 6, 2026
Homeनगरझेडपी : गट-गण प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

झेडपी : गट-गण प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात २०२२ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरूस्तीनूसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्ती जास्त ७५ तर कमीत कमी ५० गट राहणार आहे. त्यात्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

नगरसह राज्यातील महापालिका, नगर पालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठच गुरुवार १२ रोजी राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. १४ जुलैपासून प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू होणार असून १८ ऑगस्ट २०२५ ला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात पावले उचलली आहेत. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह राज्यातील इतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कामांना गती मिळणार आहे.

YouTube video player

गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गत २०१७ च्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेचे ७३ गट तर पंचायत समित्यांसाठी १४६ गण होते. दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात वाढीव लोकसंख्या गृहीत धरून गटांची संख्या वाढवून ८५ गट व १७० गण करण्यात आले होते. परंतु, राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही गत निवडणुकीप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तालुकानिहाय ओबीसी, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या निश्चित करून त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. या माहितीच्या आधारे ग्रामविकास आयोगाने जिल्हा परिषद गट व गणाची प्रभाग निश्चित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जुन्याच आरक्षणानूसार निवडणूका घ्याव्यात असे न्यायालयाच्या आदेशात म्हटलेले आहे. यामुळे सरकार २०१७ आरक्षण की २०१२ च्या आरक्षणानुसार निवडणूका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आधी लगीन मनपा की झेडपी ?

चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला. नगरविकास विभागाने बुधवारी ११ रोजी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले व गुरुवारी प्रभाग रचनेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तसेच गुरुवारीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर १८ ऑगस्टनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी केलेली प्रभाग रचना अंतिम होणार आहे. त्यामुळे राज्यात महापालिका की जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका अगोदर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे लोकसंख्येची आकडेवारी

ग्रामीम लोकसंख्या-३६ लाख ४ हजार ६६८

* अनुसूचित जाती- ४ लाख ४६ हजार ४६४
* अनुसूचित जमाती- ३ लाख ५७हजार ४५३

२०१२ मधील जिल्हा परिषद गट

२०१२ मध्ये जिल्हा परिषदेचे ७५ गट होते. त्यांची नावे अशी अकोले- समशेरपूर, देवठाण, अकोले, राजूर, सातेवाडी, कोतूळ. संगमनेर निमोण, तळेगाव, घुलेवाडी, धांदळफळ बु., जोर्वे, आश्वी बु., साकूर, बोटा. कोपरगाव – ब्राम्हणगाव, शिंगणापूर, सुरेगाव, संवत्सर, पोहेगाव बु. राहाता – पुणतांबा, साकूरी, वाकडी, लोणी खु., कोल्हार बु. श्रीरामपूर – दत्तनगर, निपाणी वडगाव, बेलापूर बु., टाकळीभान. नेवासा-बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा बु., नेवासा खु., खरवंडी, सोनई, चांदा, शेवगाव- दहिगाव ने, मुंगी, शेवगाव, वरूर बु, बोधेगाव, पाथर्डी मिरी, कासार पिंपळगाव, तिसगाव, भालगाव. नगर- देहेरे, नागरदेवळे, अरणगाव, चिंचोडी पाटील, वाळकी, राहुरी – सात्रळ, टाकळीमिर्या, ब्राम्हणी, बारागाव नांदुर, वांबोरी. पारनेर – टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी, पारनेर, कान्हुरपठार, निघोज, वाडेगव्हाण. श्रीगोंदा कोळगाव, मांडवगण, बेलवंडी बु., येळपणे, काष्टी, आढळगाव. कर्जत-मिरजगाव, चापडगाव, कर्जत, बारडगाव सुद्रीक, राशिन. जामखेड-जामखेड, खर्डा, जवळा यांचा समावेश होता.

एका गटात ५० हजार लोकसंख्या?

आठ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३ जिल्हा परिषद गट आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच १४६ पंचायत समिती गण होते. मात्र, २०२१ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येच्या प्रमाणात गट आणि गणाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याने नगर जिल्ह्यातील गटांची संख्याही ८५ केली तर गणाची संख्या १७० करण्यात आली. २०२२ पूर्वी जिल्हा परिषदेच्या एका गटात ५० ते ५५ हजार, तर पंचायत समिती गणात ३५ ते ४० हजार मतदारसंख्या होती. मात्र, २००२ मध्ये त्यात पाच ते सात हजारांची घट करण्यात येवून जिल्ह्यात गट आणि गणाची संख्या वाढवण्यात आली होती. आतापूर्वी प्रमाणे गट राहणार असल्याने जिल्ह्यात प्रत्येक गटात किमान ४५ ते ५० हजार लोकसंख्या राहणार असल्याची शक्यता आहे.

कर्जत-जामखेडमध्ये वाढला प्रत्येकी एक गट

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ७३ गट तर १४६ गण होते. दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात गटांची संख्या वाढवून ८५ तर १७० गण करण्यात आले. राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पूर्वप्रमाणेच निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी ७५ गट व १५० गण संख्या आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७५ गट राहणार आहेत. यामुळे २०१७ च्या वेळी असणाऱ्या गटात ७३ झेडपी होते. यात आता कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे. यामुळे २०१७ च्या तुलनेत यंदा जिल्हा परिषदेला ७५ गट आणि पंचायत समितीला १५० गण राहणार आहेत.

असे राहणार तालुकानिहाय गट

जिल्ह्यात १४ पंचायत समिती असून १५० गण तर ७५ गट असतील. कंसात गण अकोले ६ (१२), संगमनेर ९ (१८), कोपरगाव ५ (१०), राहाता ५ (१०), श्रीरामपूर ४ (८), नेवासा ७ (१४), शेवगाव ४ (८), पाथर्डी ५ (१०), अहिल्यानगर ६ (१२), राहुरी ५ (१०), पारनेर ५ (१०), श्रीगोंदा ६ (१२), कर्जत ५ (१०), जामखेड ३ (६).

असं राहणार प्रभाग रचना कार्यक्रम

१४ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे
२१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे
२८ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे
११ ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे
१८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे

ताज्या बातम्या