मुंबई । Mumbai
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांच्याकडून प्रत्येक प्रचारसभेत संविधाना दाखवले जाते. ते संविधान लाल रंगाचे आहे. त्याचे कनेक्शन फडणवीसांनी अर्बन नक्षलवादाशी जोडले. तसेच त्यांनी भारत जोडो यात्रेबाबत गंभीर आरोप करताना राहुल गांधी देशात अराजकता पसवत असलेल्याचा गंभीर आरोप केला.
फडणवीस म्हणाले, भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे.तसेच, राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? अशी विचारणा फडणवीस यांनी केली.
लाल सविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम यामधून होत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानात आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेत काँग्रेसकडून कर्नाटक, तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.