दौंड-नांदेड-दौंड आजपासून पुन्हा सुरू : राहुरीत रेलरोको आंदोलन स्थगित
राहुरी स्टेशन / राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेल्या दौ़ंड- नांदेड- दौंड़ ही पॅसेंजर गाडी आजपासून (दि.27) सुरू करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेस व झेलम एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना पर्यायी थांबा देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक महिन्यात सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन रेल्वेचे वाहतूक निरीक्षक श्रीकांत परेड व प्रल्हाद जोशी यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना दिल्याने आज दि. 27 डिसेंबर रोजी तालुका प्रवाशी संघटनेने पुकारलेले रेलरोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष इंद्रभान पेरणे व सचिव मंगलदास जैन यांनी दिली.
राहुरी तालुका रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत आज दि. 27 डिसेंबर रोजी रेलरोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. बंद केलेली दौंड-नांदेड-दौंड ही सवारी गाडी (पॅसेंजर रेल्वे) महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या वर्षापासून बंद केल्या होत्या. या दोन्ही गाड्या बंद केल्याने राहुरी येथून रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.त्याचा परिणाम जसा प्रवाशांवर झाला, तसा येथील रिक्षा चालक, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्या व्यवसायावर होऊन अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
त्याची दखल घेऊन राहुरी तालुका प्रवाशी संघटनेने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन पाठवून दौंड-नांदेड-दौड़ ही सवारी गाड़ी तसेच महाराष्ट्र एक्सप्रेस व झेलम एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. रेल्वे अधिकार्यांनी या पत्राला केराची टोपली दाखविल्यानंतर रेल्वे प्रवाशी संघटनेने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत आज रेलरोको आंदोलन जाहीर करताच रेल्वे प्रशासन खड़बडून जागे झाले.
दि.25 डिसेंबर रोजी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने राहुरी येथे येऊन प्रवाशी संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात रेल्वेचे वाहतूक निरीक्षक श्रीकांत परेड, प्रल्हाद जोशी, बाविस्कर, रेल्वे स्टेशन मास्टर नागोरी यांनी राहुरी तालुका प्रवाशी संघटनेने मागणी केलेल्या गाड्या सुरू करण्याबाबत 1 महिन्याची मुदत मागवून घेतली असून अनेक दिवसांपासून बंद असलेली दौंड- नांदेड-दौंड सवारी गाडी आजपासून तातडीने सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्याने संघटनेने आज जाहीर केलेले रेलरोको आंदोलन स्थगित केले आहे.