अहिल्यानगर
अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या वेताळ शेळकेने नाव कोरलं. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. वेताळ शेळके हा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी ठरला असून त्याच्या विजयानंतर लोकांनी एकच जल्लोष केला.
अंतिम कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाला. या अटीतटीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये वेताळ शेळके याने सात गुण मिळवून मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर मात केली आणि वेताळ शेळके हा 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वेताळ शेळके यास मानाची गदा प्रदान करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वेताळ उर्फ दादा शेळके आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. त्यामध्ये वेताळने पृथ्वीराज पाटील याला चीतपट करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.