Tuesday, June 25, 2024
Homeनगरमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हळद बियाण्याची छत्तीसगडला भुरळ - कुलगुरू डॉ. पाटील

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हळद बियाण्याची छत्तीसगडला भुरळ – कुलगुरू डॉ. पाटील

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

भारत हा हळद पिकाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस येथील कृषी तंत्र विद्यालयात उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील यांनी सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ

राहुरी कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रेरणेने अनेक अमुलाग्र बदल होत असताना दिसत आहेत. कसबे डिग्रज जि.सांगली येथील कृषी तंत्र विद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. मनोज माळी यांनी एक हेक्टर क्षेत्रावर सेलम आणि फुले स्वरूपा या वाणांचा हळद बीज उत्पादन कार्यक्रम हाती घेतला होता. मे 2023 मध्ये लागवड करून उरलेली सर्व कामे खुरपणी, तण नियंत्रण, कीड व रोगप्रतिबंधक उपाययोजना, भरणी खते देणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब इत्यादी सर्व कामे कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या आवडीने आणि अनुभव आधारित शिक्षण घेण्याच्या दृष्टीने केलेली आहेत.

विद्यालयाची वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील स्वतःहून एक ते दीड तास हळद काढणी, बेणे निवडणे, भेसळ ओळखणे, बेणे साठवणे, मातृकंद, बगल गड्डे, सोरा गड्डे, हळकुंडे इत्यादी सर्व कौशल्यपूर्वक कामे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केलेली आहेत. अशा प्रकारचे हळदीचे निरोगी बियाणे छत्तीसगड राज्यातील माँ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनी, अंबिकापूर, छत्तीसगड येथील संचालकांना पसंत पडले त्यांनी कृषी तंत्र विद्यालय आणि हळद संशोधन केंद्राचे एकूण 51 क्विंटल बियाणे खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि कष्टाचे कौतुक करत प्रेरणा दिली.

अशा प्रकारचे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे अन्यत्र कुठेही मिळत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर कृषी तंत्र विद्यालयाने हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे, निरोगी निर्यातक्षम बियाणे निर्मितीवर भर द्यावा आणि भविष्यात शेतकरी सेवेत कमी पडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कार्य पाहून समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या