Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा आघाडीचा निर्णय

विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा आघाडीचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक( Kasbapeth and Pimpri Chinchwad Assembly Constituencies by-elections) बिनविरोध करण्याच्या भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद न देता या दोन्ही जागा एकजुटीने लढविण्याचा निर्णय बुधवारी महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aaghadi)बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात आघाडीचे इतर घटक पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांशी अंतिम चर्चा करून आघाडीतील कोणता पक्ष कोणती जागा लढवेल याची घोषणा आज, शनिवारी करण्यात येणार आहे.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, आघाडीने पंढरपूर, देगलूर आणि कोल्हपूरच्या पोटनिवडणुकीचे दाखले देत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही पोटनिवडणुका आघाडी म्हणून लढविण्यात येणार असल्याचे घोषित केले. आघाडीतील कोणता पक्ष कोणती जागा लढवेल हे उद्याच जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भाजपने पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, अद्याप तरी आमच्यासमोर याबाबतचा प्रस्ताव आलेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही. मुंबईत भाजपला नाईलाजाने उमेदवार मागे घ्यावा लागला. त्यावेळी भाजपने साधनसूचिता, मर्यादा, संकेत पाळले नाहीत ही आमची खंत आहे, असेही पाटील म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत सुशिक्षित मतदार आघाडीच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत आमचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. महाराष्ट्राचे हे चित्र लक्षात घेता विधानसभेच्या दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. आता घटक पक्ष असलेल्या शेकाप, समाजवादी पक्ष यांच्याशी चर्चा करून उद्या अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले. तर, विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेपेक्षा आघाडीचे उमेदवार निवडून येणे हे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुका आघाडी म्हणून एकजुटीने लढविण्याचा आणि त्या जिंकण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

दरम्यान, भाजपने आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. त्यात कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणूक भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पूर्ण ताकदीने लढवायची असा निर्धार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कसबापेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची भूमिका आहे. तरीही गाफिल न राहता ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाची राष्ट्रीय निवड समिती करेल. ६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी माधुरी मिसाळ यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्राच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्यस्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या