ओझे l विलास ढाकणे
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी व रात्रीचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीने मैदानात उतरत वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली असून याचाच अनुभव दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये येत आहे यातच निळवंडी येथे महावितरणच्या वतीने वीजचोरी वसुली मोहिमेअंतर्गत अचानक धडक तपासणी मोहीम अंतर्गत मीटर बायपास करणे, अनधिकृत वीज जोडणी आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी थेट वीज वापरण्याचे गंभीर प्रकार उघडकीस करण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.
महावितरणच्या लखमापूर कक्षाचे सहायक अभियंता महेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज निळवंडी गावात ही धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान सुमारे १० वीज ग्राहकांच्या जोडण्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही ठिकाणी मीटर बायपास करून वीज वापरणे, अधिकृत मीटर नसताना नवीन बांधकामासाठी थेट वीज घेणे, तसेच सिंगल फेज व टू-फेज मोटारींचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
“वीज चोरी हा कायद्यानुसार गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. नागरिकांनी मीटरशी छेडछाड, थेट आकडा टाकणे किंवा अनधिकृत जोडण्या करणे तातडीने थांबवावे. ज्या नागरिकांकडे अधिकृत वीज जोडणी नाही, त्यांनी महावितरणकडे रीतसर अर्ज करून त्वरित अधिकृत कनेक्शन घ्यावे. वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल,” अशी वीजचोरी उघडकीस आल्यास संबंधित ग्राहकास २५ हजार ते पाच लाखांपर्यंत रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असा इशारा सहायक अभियंता महेश पवार यांनी दिला आहे.
तसेच घरगुती अथवा व्यावसायिक वापरासाठी अधिकृत वीज जोडणी घेऊन नियमित वीजबिल भरावे आणि महावितरणच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरण प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत वीज वापरकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर मोहीम महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे व अधीक्षक अभियंता अनिल थोरात व कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे व लखमापूर शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता महेश पवार यांच्या टीमने मार्फत ही कार्यवाही करण्यात आली.




