Friday, May 3, 2024
Homeनगरमहेश्वर पतसंस्था अन् नगर अर्बन बँकेच्या गोंधळात शेतकर्‍याला दीड कोटीची नोटीस

महेश्वर पतसंस्था अन् नगर अर्बन बँकेच्या गोंधळात शेतकर्‍याला दीड कोटीची नोटीस

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

काष्टी येथील महेश्वर पतसंस्था आणि नगर अर्बन बँकेच्या सावळ्या गोंधळाचा भुर्दंड सांगवी दुमाला येथील एका शेतकर्‍याला बसला आहे. या शेतकर्‍याला तब्बल 1 कोटी 40 लाख 66 हजार रुपये कर भरण्याची आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. एक वर्षापासून संबंधित शेतकरी महेश्वर पतसंस्था आणि अर्बन बँकेत हेलपाटे घालत असून ते त्यास दाद देत नसल्याने अखेर आत्महत्येचा इशारा शेतकर्‍याने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील वादग्रस्त महेश्वर पतसंस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हजेरी लावणार असल्याने राजकीय वादंग माजण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

केशव मोहन भोयटे असे याप्रकरणी तक्रार करणार्‍या शेतकर्‍यांचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी जिल्हा निबंधक तसेच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. याबाबत भोयटे यांच्या माहितीनूसार, त्यांच्या नावे सांगवी दुमला येथे 46 हेक्टर जमीन आहे. त्यांना 2018-19 मध्ये महाराष्ट्र शासनाची पिक कर्जावरील 91 हजार 600 रुपयेची मिळालेली कर्जमाफी रद्द झाली. ती का रद्द झाली याचे कारण शोधतांना त्यांना समजले की, काष्टी येथील नगर अर्बन बँक शाखेतील त्यांच्या खाते नंबर 000918 मधून पॅनकार्डच्या आधारे सुमारे 7 कोटी 81 लाख 49 हजार 670 रुपयांचा व्यवहार करत बँकेने शासनाचा कर चुकवला आहे. त्यामुळे 18 टक्क्याने दंडानुसार 1 कोटी 40 लाख 66 हजार रुपये आयकर भरावा, अशी नोटीस भोयटे यांना मिळाली.

नोटीस मिळताच भोयटे यांना धक्का बसला. त्यावर त्यांनी सदर व्यवहाराची नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. काष्टी शाखेत केशव भोयटे यांच्या पॅन कार्डचा वापर करून महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत खाते नंबर 000338 कस्टमर नंबर 1758263 वरून सर्व व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. अर्बन बँकेत महेश्वर संस्थेचे झालेले व्यवहार भोयटे यांच्या पॅन नंबर वर दिसत आहेत. यामुळे भोयटे यांना नोटीस आलेला 1 कोटी 40 लाख 66 हजार रुपयांचा शासनाचा बुडविलेला कर कोणी भरायचा असा प्रश्न आहे. यासाठी ते महेश्वर पतसंस्था, तसेच नगर अर्बन बँकेचे उंबरठे झिझवत आहेत. परंतु त्यांना कोणीही दाद देत नाही. याबाबत भोयटे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस निरिक्षक श्रीगोंदा, सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहेत. मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याचा असा इशारा भोयटे यांनी दिला आहे.

नगर अर्बन बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याने बँकेवर प्रशासक नेमले आहेत. आता महेश्वर पतसंस्थेने आम्हाला न्याय द्यावा. या संस्थेचे अध्यक्षांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा देशाचे नेते खा. शरद पवार पतसंस्थेच्या इमारत उद्घाटनासाठी बोलावले आहे. मात्र, माझ्यासारख्या सामान्य शेतकर्‍याला आर्थिक अडचणीत आणून इव्हेंटवर वारेमाप खर्च करणे योग्य आहे का? असा माझा सवाल आहे.

– केशव भोयटे, अन्यायग्रस्त शेतकरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या