अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हास्तरावर अद्ययावत अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रत्येक तालुक्यात उमेद मॉलची उभारणी करण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. नगरमध्ये जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साईज्योती सरस 2025 महिला बचतगट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
बचत गटांसाठीच्या अभिनव उपक्रमाच्या आयोजनाचा जिल्ह्याला मान मिळाल्याचा मनस्वी आनंद व्यक्त करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशाच्या विकासातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.महिलांमध्ये असलेली उद्यमशिलता, क्रियाशक्तीला अशा प्रकारच्या उपक्रमांची साथ दिल्यास निश्चितच महिलांमध्ये अधिक प्रमाणात उर्जाशक्ती निर्माण होऊन देशाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्यभरात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात चार लाख महिला या बचत गटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात विविध बचतगटांना कर्ज, बँकींग सर्व्हीस मशिन तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मान्यता प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच लखपती दीदीअंतर्गत महिलांचा सन्मानही करण्यात आला.
20 मार्चपर्यंत राहणार सुरू
नाशिक विभागातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण 325 बचतगट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनामध्ये वस्तू विभाग दालनामध्ये विविध वस्तूंचे 120 स्टॉल उपलब्ध असून यातून 240 बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच खाद्य विभागाच्या दालनामध्ये 85 बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट अशा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत.पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार असून 20 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
पालकमंत्र्यांकडून स्टॉलची पहाणी
विभागीय साईज्योती सरस 2025 प्रदर्शनात विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेल्या बचतगटांच्या स्टॉलला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन उत्पादित केलेल्या मालाची पहाणी करत महिलांशी संवादही साधला.