संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील माहुली घाट येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पिकअपमध्ये असलेली शेतीची औषधे चोरुन पोबारा केला होता. याप्रकरणी घारगाव पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असून, मूळ फिर्यादीनेच बनाव करुन तिघांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 15 लाख 12 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की 31 जानेवारी रोजी मध्यरात्री दीपक किसन कदम (वय 42, रा. राजगुरूनगरवाडा, ता. खेड, जि. पुणे) हे 5 लाख 72 हजार 214 रुपये किंमतीची शेतीची औषधे भरलेली पिकअप (क्र.एमएच.42, एक्यू.8078) घेवून पुणेकडून नाशिककडे जात असताना त्यांना चाळकवाडी टोलनाका येथून दोन प्रवाशांनी लिफ्ट मागितल्याने त्यांनी दोघांना बसविले. त्यांना घेवून माहुली घाट (खंदरमाळ) येथे आले असता पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास दोघांपैकी एकाने बाथरूमला लागले म्हणून गाडी थांबव असे सांगितले. त्याचवेळी दुसर्याने गावठी कट्टा कदम याच्या कमरेला लावला आणि पांढरा रूमाल नाकास लावत बेशुध्द केले. त्यानंतर चालक कदम यास सकाळी 7.30 वाजता शुध्द आली असता तो गाडीच्या हौदात होता, परंतू गाडीमध्ये शेतीची कोणतीही औषधे नव्हती. तेव्हा गाडी मालकाला फोन करून सदर घटना कळवत आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी घारगाव पोलिसांत गुन्हा वर्ग केला.
सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्याकडे दिला. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम तपासला. तसेच हिवरगाव पावसा टोलनाका, चाळकवाडी टोलनाका येथील सीसीटीव्ही फूटेज तपासून फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर काढले. त्यावरून तांत्रिक विश्लेषण करून इतर संशयित आरोपींबाबत माहिती प्राप्त करून त्यांच्याही मोबाईल क्रमांकांचे सीडीआर काढून तपास केला. या माहितीसह गुप्त बातमीदाराकडून समजलेल्या माहितीवरुन रोहकल (चाकण, ता. खेड, जि. पुणे) येथे पोलीस पथकासह आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर (वय 27, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा इतर तीन साथीदार दीपक किसन कदम, तेजस प्रकाश कहाणे (वय 21, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) व नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय 28, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल व पिकअप असा एकूण 15 लाख 12 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस हवालदार एकनाथ खाडे, पोलीस शिपाई चांगदेव नेहे, सुभाष बोडखे, समर्थ गाडेकर यांनी केली आहे.