अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बहिण माझी लाडकी योजनेसाठी नगरसह राज्यात युध्द पातळीवर काम सुरू आहे. अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र, ग्रामसेवक यासह जवळपास सर्व शासकीय विभागातील कर्मचारी आणि अधिकारी या योजनेत महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी राबत आहेत. या योजनेचे अर्ज भरताना कोणीही महिलांची आर्थिक पिळवणूक, फसवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ थेट कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी दिले.
मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेचा मुख्यमंत्री शिंदे यांनी काल ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला. योजनेत महिलांचे अर्ज भरतांना कोणी आढळून आल्यास संबंधीतांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवा. शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्यावर निलंबनासह अन्य कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. या बैठकीला राज्याचे मुुख्य सचिव यांच्या महसूल, महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांसह जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण उपायुक्त राधाकिसन दवेढे, योजनेचे नोडल अधिकारी मनोज ससे यांच्यासह अधिकारी उपस्थित होेते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी पुणे, नाशिकसह नगर जिल्ह्यातील योजनेसाठी दाखल अर्जाची स्थिती जाणून घेतली. तसेच अधिकार्यांना योजनांची अंमलबजावणी करतांना काळजी घेत पात्र लाभार्थी यांचे अर्ज दाखल करून घेण्याच्या सुचना केल्या.
नगर जिल्ह्यात 3 लाख 82 हजार नोंदणी
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जवळपास सर्वच शासकीय यंत्रणा बहिण माझी लाडकी योजनेच्या अंमलबजावणीत व्यस्त दिसत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 82 हजार 978 महिलांची नोंदणी झालेली असून यासाठी 8 हजार 881 मदत केेंद्र कार्यरत असून 1 लाख 46 हजार 875 महिलांचे ऑनलाईन तर 2 लाख 36 हजार 103 महिलांचे ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती नोडल अधिकारी ससे यांनी दिली.