Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसमृद्धी महामार्गावर मोठा अपघात; दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; दोघांचा मृत्यू

- Advertisement -

सिन्नर | वार्ताहर Sinnar

YouTube video player

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज (दि. 1) दुपारी 3.21 वाजता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून टँकरला लागलेल्या आगीत चालक व क्लिनरचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाणारा आयशर क्रमांक एम. एच. 03/ डी. व्ही. 8455 हा महामार्गावरून मार्गस्थ असताना त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या केमिकलचा टँकर क्र. यु. पी. 64/ ए. 6841 ने आयशरला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दोन्ही वाहने महामार्गावरील सुरक्षा कठडे तोडून थेट महामार्गाच्या खाली कोसळली. अपघातानंतर टँकरमध्ये भरलेला ज्वलनशील द्रव पदार्थ अचानक पेट घेतल्याने संपूर्ण टँकरने काही क्षणांतच भीषण आग धरली. आगीचे लोळ आणि दाट धुरामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. टँकरमधील चालक कृष्णा मोहन यादव (४२) रा. मध्य प्रदेश व क्लिनर अंतीमलाल रावत (२०) रा. मध्य प्रदेश हे दोघेही आगीत अडकून गंभीररित्या भाजले गेले.

स्थानिक नागरिक व महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तातडीने बाहेर काढून उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, आयशर वाहनातील चालक सुरेंद्र यादव (२५) हा अपघातात किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वावी पोलीस ठाणे, सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या एकाहून अधिक वाहनांच्या मदतीने दीर्घ प्रयत्नांनंतर भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमुळे टँकर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहेत.

या भीषण अपघाताबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताचे नेमके कारण, वेग, वाहनांतील तांत्रिक दोष तसेच सुरक्षाविषयक बाबींचा तपास केला जात आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वेग नियंत्रण, जड वाहनांची सुरक्षितता व अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...