– संदीप जाधव
उडी उडी रे पतंग मेरी उडी रे…ले के बादलों का संग…चली जाऊंगी….असं जुनं प्रसिद्ध गाणे 1957च्या गाजलेल्या भाभी या प्रसिद्ध चित्रपटातील. आज आठवण्याचे कारण म्हणजे उद्याचा संक्रांतोत्सव. भारतात संक्रांतीच्या पतंगबाजीला जुना इतिहास आहे. पतंग बनवण्यासाठी ताव (कागद) आणणे….तो चौरस कापणे… त्याला लावायला बांबूच्या काड्या आणून त्या खळीने चिकटवणे…पतंगाचे मंगळसूत्र अगदी मापे घेऊन करणे….पांढर्या शुभ्र धाग्याला शिरसच्या सहाय्याने काचेची भुकटी चिकटवून मांजा तयारकरणे व मोकळ्या मैदानात आकाशात मुक्त विहरणार्या पतंगाने दुसर्याची पतंग कटवणे…याची मजा काही औरच. जुना काळ आता बदलला आहे. नायलॉन मांजाचे संकट पतंग उत्सवावर आले आहे… मानवी व पशु-पक्ष्यांचे जीवन त्यामुळे धोक्यात आले आहे….हे सर्व टाळून पतंगोत्सवाची मजा घेण्याची परंपरा जपली पाहिजे….
उडी उडी रे पतंग मेरी उडी रे…ले के बादलों का संग…चली जाऊंगी….असं जुनं प्रसिद्ध गाणे 1957च्या गाजलेल्या भाभी या प्रसिद्ध चित्रपटातील. आज आठवण्याचे कारण म्हणजे उद्याचा संक्रांतोत्सव. भारतात संक्रांतीच्या पतंगबाजीला जुना इतिहास आहे. पतंग बनवण्यासाठी ताव (कागद) आणणे….तो चौरस कापणे… त्याला लावायला बांबूच्या काड्या आणून त्या खळीने चिकटवणे…पतंगाचे मंगळसूत्र अगदी मापे घेऊन करणे….पांढर्या शुभ्र धाग्याला शिरसच्या सहाय्याने काचेची भुकटी चिकटवून मांजा तयारकरणे व मोकळ्या मैदानात आकाशात मुक्त विहरणार्या पतंगाने दुसर्याची पतंग कटवणे…याची मजा काही औरच. जुना काळ आता बदलला आहे. नायलॉन मांजाचे संकट पतंग उत्सवावर आले आहे… मानवी व पशु-पक्ष्यांचे जीवन त्यामुळे धोक्यात आले आहे….हे सर्व टाळून पतंगोत्सवाची मजा घेण्याची परंपरा जपली पाहिजे….
संक्रांत म्हटलं की पतंगबाजी हे समीकरण नगरकरांच्या मनात घट्ट बसलेलं. तसं पाहिलं तर राज्यातील अनेक ठिकाणीही संक्रांतीला पतंग उडविले जातातच, पण नगरला मात्र पतंगबाजीचा अन् पतंगबाजांचा उत्साह काहीऔरच असतो. आमच्या बालपणी पतंगाचा उत्साह खूपच वेगळा होता. जानेवारीत येणार्या संक्रांतीच्या पतंगबाजीची चाहूल दिवाळीच्या सुट्टीतच लागायची. सुट्टी लागली रे लागली की नगरच्या आकाशात पतंग उडताना दिसायचे. अनेकांना पतंग उडवण्यापेक्षा कटलेले पतंग पकडून गोळा करण्यातच आनंद असायचा. ज्याच्याकडे मांजा चांगल्या दर्जाचा असायचा त्याचे पतंगांच्या काटाकाटीत (म्हणजेच गोतीमध्ये) वर्चस्व असायचे. कटलेला पतंग हाती येईल की नाही हे माहीत नसतानाही आम्ही त्याच्यामागे धावायचो. तहान-भूक विसरून, पायात चप्पल वगैरे काही नसतानाही काट्या-कुपाट्यातून पळताना कशाचीही तमा नसायची. एवढे करूनही हाती पतंग लागला तर ठीक, नाहीतर थोडा मांजा जरी भेटला तरी समाधान वाटायचे.
पतंगांच्या काटाकाटीत मांजा लुटणे ही क्रिया सुद्धा जोमाने केली जायची! एखाद्याचा पतंग कटल्यानंतर मागचा उर्वरित मांजा आखडताना आपल्या हाती लागतो का, हे आम्ही पाहायचो. दिसला आणि आपल्या आवाक्यात आला की तो पकडायचा म्हणजेच लुटायचा. जर मांजा मोठ्या लांबीचा मिळाला तर आनंद गगनात मावत नसे. अनेकदा पतंग पकडण्याच्या नादात एकमेकांशी संघर्षही व्हायचा. कटलेला पतंग खाली येताना त्याचा मांजा एकाचवेळी अनेकांच्या हाती लागायचा. मग पतंग नक्की कोणी पकडला यासाठी भांडणं व्हायची. मग कधीकधी तर ‘तुला ना मला.. घाल कुत्र्याला…’ या म्हणीचा संदर्भ घेत तो पतंग फाडला जायचा! पतंग पकडण्यासाठी ‘शेकाट’ या साधन वापरला जायचे. शेकाट म्हणजे काय तर उंच काठी, किंवा बांबू घेऊन त्याच्या टोकाला बाभळीची वाळलेली काटेरी फांदी बांधायची. त्याचा आधार घेत पतंग अनेकदा हवेतल्या हवेतच पकडला जायचा.
पतंगांच्या गोंडा, बॉट्टल, झोपडी या मुख्य प्रकारांमध्ये अनेक उपप्रकारही असायचे. छोट्या पतंगाला टुक्कल, तर मोठ्या पतंगाला लोध्या म्हटले जायचे. त्याबरोबर फर्र्या, चट्टल, दुरंगा, तिरंगा, दोन डोळ्यांचा, सांबा, तागाभरी, शेपटाड आदी प्रकारचे रंगीबेरंगी पतंग दुकानात मिळायचे. या पतंगांबरोबरच आता मिकीमाऊस, बाहुबली, फुलपाखरू, मोदी, वाघ, सुरती, भवरा आदी फॅन्सी पतंगांबरोबरच अॅग्रीबर्ड, सुपरमॅन, टॉम अॅण्ड जेरी, छोटा भीम, डोरेमॉन, बार्बी, मोटू-पतलू हे कार्टून पतंग बच्चेकंपनीत लोकप्रिय आहेत. पतंग उडविण्यासाठी लागणारा मांजा आम्ही तयार करायचो. (तेव्हा नायल ॉन मांजाचे प्रस्थ नव्हते.) त्याला आम्ही मांजा सुतवणे असे म्हणायचो. त्यासाठी दोर्याचा रीळ, बारीक केलेली काच, शिरस आदी साहित्य लागायचं. रिळ तर बाजारातूनच विकत घ्यायचो. 400 मीटर दोर्याचा रीळ 3 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत असायचो. पण आम्हाला 5 रुपयांपेक्षा जास्त महाग रिळ कधीही घ्यायचो नाही. श्रीमंत असणारे मात्र 50 रुपयांपर्यंतचा रिळ विकत घ्यायचे. मांजासाठी लागणारी काच विकतही मिळायची.
मात्र, त्यात रांगोळीची भेसळ असल्या कारणाने आम्ही काचही घरीच कुटायचो. खलबत्त्यात थम्सअपच्या बाटल्या कुटल्या जायच्या. हा सामूहिक उपक्रम सात-आठ दिवस तरी चालायचा! सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दोन तास व शाळेतून घरी आल्यानंतर दोन तास आम्ही मित्र आळीपाळीने काच कुटायचो. खलातून काच बाहेर उडू नये म्हणून त्यावर पुठ्ठा टाकला जायचो. बत्त्याच्या आकाराचे छिद्र पाडून आमची काचाकुट चालायची. अनेकदा पालकांचा रोषही पत्करायचा. पण आमच्या पतंगबाजीच्या छंदापुढे आम्ही सारेकाही सहन करायचो. कुटलेली काच वस्त्रगाळ करून त्याची पावडर एका बरणीत भरली जायची. काच दोर्याला चिकटावी म्हणून शिरस वापरली जायची. एक-दोन रुपयांची शिरस आणून ती एका पत्र्याच्या डब्यात ठेवली जायची. त्यात पाणी टाकून आगीवर गरम केल्यानंतर त्यात हवा तो रंग टाकला जायचा. मग एका बाजूला रिळातून येणारा दोरा प्रथम शिरसच्या डब्यात व नंतर मुठीत कापडाच्या साहाय्याने धरलेल्या काचेतून बाहेर काढला जायचा. शिरस व काच धरण्यात पटाईत असणार्यांनाच ही जबाबदारी दिली जायची.
दुसरे टोक चकरीला बांधून लांबवर नेला जायचा. मांजा जमिनीवर टेकू नये म्हणून दोन-तीन जण तो उचलून धरायचे. मग तो वाळला की चकरीवर गुंडाळला जायचा. तयार झालेला मांजा प्रत्येकजण सांभाळून वापरायचा. स्वतःचा मांजा असूनही कटलेल्या पतंगीचा मांजा गोळा करण्याचे मनसुबे मात्र कायम असायचे. कारण त्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान असायचे. दिवसभरात कोणी किती पतंग पकडले याचा हिशोब आमच्या कॉलनीतील प्रत्येक पतंगबाज मित्राकडे असायचा.
संक्रांत जसजशी जवळ येईल तसतशी तयारी जोर धरायची. दोन दिवस आधीच नवीन पतंग आणून सूत्तर (काहीजण मंगळसूत्रही म्हणतात) पाडले जायचे. अर्थात त्यात तंत्र वापरले जायचे. अनेकांकडे ती हातोडी असायची. अशा रितीना पतंगबाजीसाठी मांजा-पतंग सज्ज ठेवले जायचे. संक्रांतीच्या दिवशी सकाळीच सर्वजण घराबाहेर येऊन हवेचा आनंद घ्यायचे. मग पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात किंवा आमच्या डाक बंगल्यात (सरकारी कर्मचारी वसाहत) दोन इमारती होत्या. त्यावरून पतंग उडविण्याचा आनंद घ्यायचो.
आमच्याबरोबरच वडिलधारी मंडळाही पतंग उडविण्यासाठी यायची. आम्ही पतंग उडवत असताना एखादा कटून आलेला पतंग दिसला की त्याच्या मागे पळणे हे आमच्या अंगवळणी पडलेले असायचे. संक्रांतीला कोणी किती पतंग कापले, किती गेले याचाही हिशोब आमच्याकडे असायचा. संक्रांतीला आकाशात पतंगांचे जणू मोहोळच दिसायचे. पतंग काटाकाटीत ओय कापे.. बैठे बैठे कापे… असे म्हणत व्यक्त करणारा जल्लोष मात्र आजही तसाच आहे. संक्रांतीला दिवसभर तहान-भूक विसरून आम्ही पतंगबाजीत मग्न असायचो. या दिवशी साधारणतः दुपारी दोनपर्यंत व चारनंतर अंधार पडेपर्यंत पतंगबाजीचा उत्साह कायम असायचा. रात्री काहीजण मांजाला दिवे लावून पतंग उडवायचे. पुढे अनेक दिवसही पतंग उडवले जायचे. संक्रांतीच्या रात्री मग सर्व मित्र एकत्र येऊन आमच्या डाक बंगल्यातील प्रत्येक घरी तिळगूळ मागायला जायचो. त्यावेळीही पतंगबाजी हा आमच्या चर्चेत येणारा महत्त्वाचा विषय असायचा. त्या वेळच्या पतंगबाजीचा उत्साह मात्र आज दिसत नाही. जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर सध्या होतो. मानवासह पशू-पक्ष्यांसाठी घातक ठरणारा हा मांजा टाळायलाच हवा. संक्रांत आली की आमचे त्या वेळचे पतंगबाजीचे दिवस आठवल्याशिवाय राहत नाही.