Thursday, March 27, 2025
Homeनगरमेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

‘अल्युमिनीयम मॅन’ तथा तौरल इंडियाचे सीईओ भरत गीते यांची भावना

अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील

‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा विशेष अभिमान वाटतो, त्यांनी मेड इन इंडियाऐवजी मेक इन इंडियावर लक्ष केंद्रीत केलं. मेक इन इंडिया ही मेड इन इंडियाकडे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करणारी प्रक्रीया आहे. तौरल इंडिया या प्रयत्नात आपला वाटा उचलतो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशा भावना कंपनीचे सीईओ आणि बीड जिल्ह्यातील परळीचे सुपुत्र आणि सध्या भारतीय उद्योग जगतात ‘अल्युमिनीयम मॅन’ म्हणून परिचित भरत गीते यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी दावोस जागतिक आर्थिक परिषदेतून ‘सुपा एमआयडीसीत 500 कोटींचा प्रकल्प साकारणार’ अशी बातमी धडकली. हा जिल्हातील उद्योग क्षेत्राला सुखद धक्का होता. मोठ्या काळानंतर अशी गुंतवणूक जिल्ह्याच्या दिशेने आली होती. तेव्हा प्रश्न पडला, हा निर्णय कोणाचा? तेव्हा नाव समोर आले ते ‘तौरल इंडिया लिमिटेड’ आणि कंपनीचे संस्थापक सीईओ भरत गीते यांचे. नावावरून मातीतला माणूस आहे, याचा अंदाज तर आला होता. त्यांच्याशी संपर्क झाला, संवाद झाला आणि दुसर्‍याच दिवशी ते नगर एमआयडीसीतील ‘सार्वमत’च्या कार्यालयात उपस्थित होते. ही सदिच्छा भेट तशी अनपेक्षितच होती. पण चर्चा करताना जाणवले, हे रसायन अस्सल देशी मातीतील आहे. परळी, लातूर, पुणे, जर्मनी असा प्रवास करून उद्योगाने यशाची गवसणी घातली तरी जमिनीवरील पाय घट्ट आहेत. शेतकरी कुटुंबातून आल्याने अंगभूत लढावू जिद्द आणि जर्मनीत असताना अंगी बाणलेले उच्च तांत्रिक, व्यावसायिक संस्कार याचा आकर्षक मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवला. त्यांना बोलते केले तर ते भरभरून बोलले. स्पष्ट आणि सकारात्मक हा औद्योगिक विकासाचा आवश्यक गुण त्यांच्या दिलखुलास चर्चेतून उलगडला.

आजवरच्या वाटचालीचा पट त्यांनी ‘सार्वमत’समोर मांडला. उद्योजक होण्याच्या प्रवासापर्यंत तो समस्त भारतीयांच्या ‘इमोशन’ या स्वभावगुणानुसार भासतो आणि त्यांच्यातील उद्योजक जागा झाला की तो कमालीचा प्रोफेशनल असतो. मोठी गुंतवणूक करून उद्योग उभा करणारा तरूण उद्योजक अशा चौकटीत त्यांना बसवणे योग्य ठरणार नाही. उद्योगासोबत शिक्षण, प्रशासन, समाजकारण अशा अनेक अंगाने अनुभवसिद्ध होण्याची त्यांची धडपड जाणवते. आज संरक्षण, उर्जा, रोबोटीक, हेल्थकेअर, सागरी तंत्रज्ञान (मरिन), रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील सॅण्ड कास्टींग प्रकारातील अ‍ॅल्युमिनीयम कास्टींग कंपनी म्हणून ‘तौरल’ देशात अग्रेसर आहे.

या प्रवासाची सुरूवात आणि तौरल आकारास येण्यापर्यंत घटना उलगडताना श्री. गीते म्हणतात, जर्मनीत 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परत येऊन पुण्यात जी अ‍ॅण्ड बी मेटल कास्टींगची मुहूर्तमेढ रोवली. तौरल इंडियाचा जन्म या ‘जी अ‍ॅण्ड बी’च्या उदरातून झाला. त्यामुळे माझा हा स्टार्टअप् माझ्या स्वतंत्र उद्योजकतेच्या शिक्षणाची पहिली पायरी होती. जर्मनीला शिक्षण आणि कामासाठी जाण्याआधी एक निर्धार केला होता, तो म्हणजे जागतिक स्तरावर सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेल्या जर्मन्सच्या सानिध्यात त्यांचं तंत्रज्ञान आत्मसात करायचा आणि भारताच्या औद्योगिकरणासाठी त्याचा काही एक उपयोग नक्की करून घ्यायचा. याला माझं जगण्याचं इमोशन म्हणा हवं तर! पण या भावनेला वास्तव जगात अन्य काही गोष्टींची जोड लागते. पैसा लागतो, तंत्रज्ञान लागतं. सोबत विश्वासाची माणसं लागतात. तेव्हा जर्मनीतच मित्र, मार्गदर्शक जोडण्यास सुरूवात केली. ते वर्ष होतं 2012 चं! पुढे दोन वर्षात या प्रयत्नांना यश दिसू लागलं. याच काळात वर्षभर शॉप फ्लोअरवर कामगार म्हणून काम करण्याचा अनुभव आद्योगिक दृष्टीकोनास पैलू पाडणारा ठरला. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीओइपी) येथून पदवी, युरोपात नावाजलेल्या जर्मनीतील टेक्नीकल युनिर्व्हसिटी ऑफ आखन येथून पोस्ट ग्रॅज्युएशन, हावर्ड विद्यापीठातून लिडरशीप प्रोग्राम अशा शिक्षणानंतरही कामगार म्हणून काम करणे, हा वेगळा अनुभव ठरला. कारण अभियंता म्हणून शिक्षण घेतल्यानंतर तांत्रिक शिक्षण तर मिळते, पण अनुभव हा प्रत्यक्ष कामातूनच अवगत करता येतो. एखादा उद्योग उभा करायचा तर तुम्हाला शॉप फ्लोअरची वास्तविकता (रिअ‍ॅलिटी) माहिती पाहिजे. मी त्याला नेहमीच ‘लर्निंग अ‍ॅण्ड अनलर्निंग’ म्हणतो. जो माणूस लर्निंग सोडायला तयार नाही त्याने शास्त्रज्ञ बनावं आणि जो अनलर्न करायला तयार होतो त्यानं उद्योजक व्हावं. कारण उद्योजक व्हायचं असेल तर लहान-सहान अडचणींवर मात करायला तयार असलं पाहिजे. जी अ‍ॅण्ड बी सुरू केल्यानंतर काही जर्मन मित्र भेटीसाठी आले होते.

मी जर्मनीतील संधी सोडून भारतात परत येऊन करतो तरी काय, याची त्यांना उत्सुकता होती. त्यावेळी मला अडचणींच्या सोडवणुकीसाठी सारखे येणारे फोनकॉल बघून माझी कॅथरिन नावाची मैत्रिण म्हणाली, ‘तू वेडा होशील हे फोन घेऊन.’ मी कामगार म्हणून जर्मनीत काम करायचोे तेव्हा एक जर्मन सुपरवायझर मला ‘काय डॉक्टर गीते काय चाललंयं?’ असा टोमणे मारायचा. तंत्रज्ञानात उच्चशिक्षण घेतल्यानंतरही कामगार म्हणून काम करण्याबद्दल चिमटे घेण्याची त्याची ही पद्धत होती. पण जर्मनीत शॉप फ्लोअरवर काम करण्याचे दिवस असोत किंवा पुण्यात जी अ‍ॅण्ड बीच्या प्रारंभीच्या दिवसात 10 कामगारांसोबत स्वत: राबणे असो, हे दिवस मी एन्जॉय केले. ते आनंददायी दिवस होते. शेवटी ही एक प्रक्रीया आहे. या प्रक्रीयेत आनंद घेता येत असेल, तरच तुम्ही काही मोठं काम उभं करू शकता.

2014 मध्ये मी अ‍ॅल्युमिनीयम कास्टींग बनवायला लागलो. तो तसा कच्चा माल. येथे फक्त कास्टींग तयार व्हायची, तिचं युरोपात जावून मशिनींग व्हायचं. त्यावेळी माझ्याकडे मशिनींग सुविधा नव्हती. त्यावेळी लक्षात आलं की आपली कास्टींग तर उत्तम आहे, पण मशिनींगच्या प्रवासातील जर्मनीपर्यंतचे 7 हजार किलोमीटरच अंतर खूपच मोठं होतं. मग येथेच इकोसिस्टीम निर्मितीचा प्रयत्न केला. पण मागणी माफक होती. देशातील अ‍ॅल्युमिनीयम सेक्टर तत्कालीन स्थितीत वाढीच्या दिशेने होते. त्यात डायकास्टींगचं प्रमाण अधिक होते. जटील तंत्रज्ञान असल्याने सॅण्ड कास्टींग प्रकारात काम तुलनेने कमी होतं. सॅण्ड कास्टींगमध्ये तयार होणारे पार्ट वजनाने मोठे असतात. वर्षाला मागणीही 100 ते 500 पार्ट अशी जेमतेमच म्हणावी अशी. या पार्ट्साठी डायकास्ट सारख्या पर्मनंट मोल्डवर जाता येत नाही. तंत्रज्ञानातील हीच पोकळी शोधली आणि सॅण्ड कास्टींगकडे वळलो. प्रारंभीची गुंतवणूकही आवाक्यात होती. तरूण, होतकरू सहकारी शोधले. त्यांना तंत्रज्ञान शिकवले. त्यातून जे घडले ते आमच्यासाठी उत्साहवर्धक होते. कारण आम्ही बनवलेल्या कास्टींग या जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम होत्या. सिमेन्स, जनरल इलेक्ट्रीक अशा जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी माझ्या प्लँटला भेटी देवू लागले. ‘तुमची कास्टींग युरोपीअन स्तराची आहे. पण तुम्ही केवळ 10 जणांच्या टीमने काम करता. सप्लाय चेन, मनुष्यबळ विकास, मशीन कंपोनन्ट, लीक टेस्टींग, पेंटींग हा सर्व इकोसिस्टीमचा भाग पूर्णत: एकाच छताखाली हवा.’ असा सल्ला आणि मागणी त्यांच्याकडून पुढे येत होती.

युरोपमध्ये ज्यांना पुरवठा करत होतो, त्या कंपनीच्या व्यवस्थापनात काही बदल झाले. त्यांचे निर्णय बदलायला लागले. हा काळ माझ्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीचा होता. पुण्यातील कंपनी बंद करा आणि पुन्हा जर्मनीत जावून नोकरी करा, हा त्यावरील सोपा मार्ग! पण जेव्हा आपण विपरित परिस्थितीचे धक्के खात पुढे येतो, खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मापासून कायम संघर्षाचे दिवस पाहिलेले असतात तेव्हा आपसूक जिद्दही मोठी असते. मागे वळण्याची इच्छा नव्हती. मग पुढे कसा निघालो, या प्रश्नाच्या उत्तराआधी एक आठवण सांगतो. 2015 मध्ये जर्मनीतील गोष्ट. हॅनोवर ट्रेडफेअरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. अ‍ॅन्जेला मार्केल जर्मनीच्या तेव्हा चान्सलर होत्या आणि भारत या ट्रेडफेअरचा सहयोगी देश होता. त्यावेळी पहिल्यांदाच भारताबाहेर ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना मांडली गेली. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सिंह एक सभागृहात झळकला आणि तेथे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. देशाच्या आणि उद्योजकतेच्या सीमा ओलांडून भारतही पुढे जाऊ शकतो, याची जाणीव अनेकांना झाली. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन आहे.

आपण मेड इन जर्मंनीसारखं काही का उभारू शकत नाही, हा प्रश्न यातूनच पुढे येतो. म्हणून पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचा विशेष अभिमान वाटतो, त्यांनी मेड इन इंडियाऐवजी मेक इन इंडियावर लक्ष केंद्रीत केलं होतं. कारण तो प्रक्रीयेचा भाग होता. मेक इन इंडिया ही मेड इन इंडियाकडे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करणारी प्रक्रीया आहे. 2015 मध्ये महाराष्ट्राचे विद्यमान आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली. दोन दिवस उत्तम संवाद घडला. त्यावेळी त्यांनी ‘भारतात या आणि उद्योग करा, सरकार मदत करेल’ असा सल्ला मला दिला. अर्थात मी आधीच भारतात उद्योगाची सुरूवात केली होती. पण त्यांच्या शब्दांनी हुरूप दिला. एका चांगल्या गुंतवणूकदार सहकारी कंपनीचा शोध सुरू केला. त्यावेळी मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र आणि माझे प्रयत्न यांना एका धाग्यात आणून मोठ्या उद्योगासाठी चाचपणी सुरू केली होती. याच काळात थोनी अलुटेक या युरोपात विस्तार असलेल्या कंपनीशी सिमेन्सचे डॉ. प्रदीप पवार यांनी भेट घडवून आणली. ‘भरत तुम्हाला भारतात रिलॉँच करू शकतो’, अशा विश्वासपूर्ण शब्दात त्यांनी थोनी अलुटेकच्या नेतृत्वाला माझी ओळख करून दिली. कारण थोनी कंपनी 2011 मध्ये भारतात आली होती.

पण विश्वास ठेवण्यासारखे या देशात काही नाही, असा अनुभव आल्याने ते ऑपरेशन्स बंद करून परतले होते. त्याच कंपनीला पुन्हा भारतात बोलवणं हे एक दिव्यच होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींना विश्वास दिला की ‘आम्ही भरतच्या पाठीशी आहोत. तुम्ही भारतात या. आमचा पूर्ण पाठींबा राहील.’ थोनी अलुटेकसारख्या कंपनीची गुंतवणूक भारतात होणे, ही भविष्यासाठी मोठी जमेची बाजू ठरली. संरक्षण, उर्जा, रोबोटीक, हेल्थकेअर, सागरी तंत्रज्ञान (मरिन), रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील तांत्रिक मशिनरीच्या बाबतीत आपण विदेशातील कंपन्यांवर अवलंबून होतो. आणि आपली कंपनी या सर्व तंत्राला स्थानिक बळ पुरवणार होती, हे आम्हालाही त्यावेळी माहिती नव्हतं. थोनी कंपनीला विश्वास मिळाल्यावर त्यांनी गुंतवणुकीला होकार दिला. जर्मनीत शिक्षण, कामाच्या काळात एकप्रकारचा जर्मन माईंडसेट माझ्यातही रूजला होता. त्यामुळे पुढे पाऊल कसं टाकायचं, याचा अंदाज होता. त्यामुळे सेल्स ऑफिसऐवजी प्लाँट टाकण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात यश आले. त्यांनी 2016 मध्ये पहिली गुंतवणूक 50 कोटी रूपयांची केली. हीच गुंतवणूक पुढील 4 वर्षात 350 कोटी रूपयांवर जावून पोहचली. या गुंतवणूकीतून चाकण उद्योगनगरीत ‘तौराल इंडिया’ घडली ती अशी! दर वर्षी दुपटीने व्यवसाय वाढतो आहे आणि आता नव्या संधी आणि विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. सुपा प्लांट हे याच विस्तारातील नवा बिंदू! (क्रमश:)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आता भोगवटादार वर्ग 2 जमिनींवर तारण कर्ज मिळणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणार्‍या शेतकर्‍यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय...