Friday, October 4, 2024
Homeमुख्य बातम्यामहिनाभरात रस्ते सुस्थितीत करा

महिनाभरात रस्ते सुस्थितीत करा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

पावसाळ्यामुळे अधिकच खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमधून नाशिककरांना प्रवास करावा लागत असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचा पाहणी दौरा केला. तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे मनपा आयुक्तांना सूचित केले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.

- Advertisement -

शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत या कंपनीने रस्ते खोदकामासाठी डॅमेज चार्जेसपोटी भरलेल्या रकमेतून तातडीने रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. बांधकाम विभागाने स्थायी समितीवर 104 कोटी रुपये खर्चून शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रस्ताव ठेवला असून, साधारण पुढील पंधरा दिवसांमध्ये खड्डे भरून रस्ते सुस्थितीमध्ये आणण्यासाठी महापालिका कामकाज सुरू करेल, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.

प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय ब्लॅक स्पॉट शोधून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निदर्शनास आणून दिले. महिनाभरात पोलीस ठाणेनिहाय पोलीस निरीक्षकांकडून यादी मागवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाच्या महाआयटीकडून त्यासाठी विशेष निधी मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यासोबतच शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक संस्था, लहान-मोठे क्लासेस व वर्दळीच्या परिसराच्या ठिकाणी टवाळखोर गुन्हेगारांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी येत असल्याने प्राधान्याने या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ज्या शैक्षणिक संस्थांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनादेखील आवाहन केले जाईल. आपला पाल्य घरातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षितपणे पोहोचेल, याची हमी देणारी व्यवस्था निर्माण केली जाईल. जेणेकरून शहरातील प्रत्येक पालक चिंतामुक्त होईल.

स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा

स्मार्ट सिटीमार्फत नाशिक शहरामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटार, जलवाहिनी, स्काडा वॉटर मीटर सिस्टिम अशी विविध कामे सुरू असून या कामांचा दर्जा खालावल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत विशेष बैठक लवकरच आयोजित करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

गावठाणामध्ये चार वर्षांनंतरही जवळपास 80 रस्त्यांची कामे अपूर्ण असून यासंदर्भात ठेकेदार व अधिकार्‍यांना जाब विचारला जाईल. आरोग्य विभागास लागणार्‍या सर्व सुविधा पुरवल्या जातील. शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या रोगांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असून, डोळ्यांचीदेखील साथ शहरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावरून आरोग्य विभागास औषधांचा तुडवडा पडणार नाही, आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख श्यामकुमार साबळे, योगेश बेलदार, योगेश चव्हाणके, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, महेश जोशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, नगरसेवक हरिष भडांगे, नगरसेविका सुवर्णा मटाले, जयश्री खर्जुल, अंबादास जाधव, दिगंबर नाडे, किरण फडोळ, शुभम पाटील, सुधाकर जाधव, आनंद फरताळे, शिवा टाकटे, विक्रम कदम, उमेश चव्हाण, कल्पेश कांडेकर, पिंटू शिंदे, विशाल खैरनार, भिवानंद काळे, सनी रोकडे, दिलीप अहिरे, आकाश पवार, मनपा अधिकारी उपस्थित होते.

वाहनांचे नुकसान करणार्‍यांची गय नाही

वाहनांचे नुकसान व जाळपोळ करणार्‍या गुंडांची यापुढे गय केली जाणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. गेल्या आठवड्यात नाशिकरोड येथील धोंगडे मळा परिसर व विहितगाव येथे गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ व काचा फोडून नुकसान केले होते. या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. पत्रकारांशी बोलताना भुसे म्हणाले की, यापुढे असे कृत्य करणार्‍यांना पोलीस धडा शिकवतील. त्याचप्रमाणे ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर कडक शासन करण्यात येईल.

रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून गुंडांवर कारवाई करावी, अशी सूचनाही यावेळी त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर भुसे यांनी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. बिटको हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांकडून काळजी घेतली जात नाही, असा आरोपसुद्धा यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खर्जुल, ज्योती खोले, हरिष भडांगे यांनी केला.

यावेळी दादा भुसे यांनी बिटको हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना विविध सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, विजय पगारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, बाबूराव आढाव, गणेश कदम, नितीन खर्जुल, विक्रम कदम, श्याम खोले, शिवा ताकाटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या