Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटाचा १७ वर्षांनंतर निकाल; २००८ मध्ये...

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटाचा १७ वर्षांनंतर निकाल; २००८ मध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल गुरुवारी (दि.३१) लागण्याची शक्यता आहे. विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या विस्तृत निकालाचे वाचन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या कालावधीत बॉम्बस्फोटाची सुनावणी करणारे न्यायाधीश वेळोवेळी बदलले. न्यायाधीश लाहोटी हे या प्रकरणातील पाचवे न्यायाधीश आहेत. त्यांनी सुनावणीला गती देऊन खटला अंतिम टप्प्यात आणला.

- Advertisement -

दरम्यान, त्यांची नाशिक येथे बदली करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबियांतर्फे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधिशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

YouTube video player

त्यानंतर काही दिवसांतच गुरुवारी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगित करत त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला, विशेष न्यायालयाने खटल्याच्या निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने खटल्याची सुनावणी ३१ जुलैला निश्चित केल्याने उद्या निकाल अपेक्षित आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अविनाश रसाळ आणि त्यांची मुलगी अनुश्री रसाळ यांनी काम पाहिले.

सरकार पक्षाची सारी बाजू प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून आहे. ज्यात आरोपींचा कॉल डेटा रेकॉर्ड आणि त्यांच्या आवाजाचे नमुने समाविष्ट आहेत. तर प्रशांत मग्गू, रणजित सांगळे यांनी आरोपींची बाजू लढवत त्यांचा या प्रकरणाशी काहिही संबंध नसून एटीएसने त्यांना यात नाहक गोवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या बहुचर्चित खटल्यात आता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी काय निकाल देतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

यांच्या विरोधात खटला

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन सहा ठार तर शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ऊर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद‌विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले होते.

२००८ मध्ये नेमकं काय घडलं होतं?

मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. रात्री ९ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतप्त झाले होते. या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.एकूण ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. त्यानंतर आज या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात लागणार आहे

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...