मुंबई | Mumbai
सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर काल ३१ जुलै रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणी मोठा निकाल दिला. मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितसह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याच निकालानंतर आता ATS च्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश मिळाले होते असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
एटीएसच्या या माजी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, RSS प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगण्यात आले होते. निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले, भगवा दहशतवादाचा सिद्धांत खोटा होता, मला मोहन भागवतांना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते. मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून हा स्फोट “भगवा दहशतवाद” आहे हे सिद्ध होईल, असे ते म्हणाले. हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठीच माझा या प्रकरणाच्या तपासात सहभाग करण्यात आला होता. मला थेट मोहन भागवतांना अडकवण्याचे निर्देश होते. हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोट तपासाचे प्रमुख अधिकारी परमबीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता असा दावा त्यांनी केला.
माजी अधिकारी मेहबूब मुजावर म्हणाले, “‘भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते आणि हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोटाचे मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिले होते असा दावाही त्यांनी केला. ” मोहन भागवत आणि इतर निष्पाप लोकांना या प्रकरणात अडकवणे, हा सरकार आणि एजन्सींचा उद्देश होता. भगवा दहशतवादाची संपूर्ण संकल्पनाच खोटी होती.” असेही ते म्हणाले.
जाणूनबुजून आरोपपत्रात जिवंत दाखवण्यात आले
मेहबूब मुजावर पुढे म्हणाले, संशयितांमध्ये संदीप डांगे आणि रामजी कलसंगरा यांची हत्या झाली होती. त्यांचे जाणुनबुजून आरोपपत्रात जिवंत दाखवण्यात आले. ते मृत असताना मला त्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचे आदेश दिले होते. जेव्हा मी या गोष्टीचा विरोध करत चुकीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु मी निर्दोष सुटलो. आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे.
सर्व निर्दोषांना निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा मला आनंद
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना कालच निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सर्व निर्दोषांना निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा मला आनंद आहे आणि मीही यामध्ये थोडे योगदान दिले आहे अशी प्रतिक्रिया मुजावर यांनी दिली. या प्रकरणात काल न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निवृत्त निरीक्षक मुजावर यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूरसह सर्व ७ आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयाने एटीएसने केलेले “बनावट काम” रद्दबातल ठरले आहे असे ते म्हणाले. खरेतर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास प्रथम एटीएसकडे होता, त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
कोण आहे मेहबूब मुजावर?
मेहबूब मुजावर हे २९ सप्टेंबर २००८ साली झालेल्या मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसचा भाग होते. एटीएसने तेव्हा काय तपास केला, का केला हे मी सांगू शकत नाही परंतु मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासारख्या लोकांबद्दल गोपनीय आदेश दिले होते. हे सर्व भयानक होते. आदेशाचे पालन करण्याचे परिणाम मला माहिती होते. मोहन भागवत यांना पकडले नाही म्हणून माझ्यावर खोटा खटला दाखल केला. त्यातून माझ्या करिअरचे ४० वर्ष उद्ध्वस्त झाले असेही मेहबूब मुजावर यांनी दावा केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




