मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
मालेगाव तालुक्यात कृषी विज्ञान संकुल, शहरात अत्याधुनिक महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती करण्याबरोबर विविध विकासकामे केली गेली. याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला. तालुक्यातील 2 लाख 25 हजार बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यात वर्ग झाला आहे. विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले परंतु न्यायालयाने योजना बंद केली नाही. उलट योजनेचे अभिनंदन केले. आता आगामी काळात महायुतीचे सरकार दीड हजारावरुन दोन हजार शंभर रुपये निधी लाडक्या बहिणींना देणार आहे. यामुळेच शहरासह तालुक्यात लाडक्या बहिणींचा अभूतपूर्व प्रतिसाद आपणास मिळत आहे. लाडक्या बहिणींचे आशीर्वादच पुन्हा एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा विजय निश्चित करत महायुतीचे सरकार आणतील, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील करंजगव्हाण येथील सभेत व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील करंजगव्हाण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विराट जनसमुदाय या सभेत उपस्थित होता. महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली होती.
विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते आपल्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र आपण विकासाच्या मुद्यावरच ही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट करत भुसे यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी देशातील पहिले पाच कृषी महाविद्यालय व एक डिप्लोमा कॉलेज काष्टी शिवारातील कृषी विज्ञान संकुलात सुरू झाले आहे. त्यामुळे कृषीविषयक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आता इतर शहरात जाण्याची गरज राहणार नाही. मालेगावच्या विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यात या कृषी पंढरीची नोंद सर्वप्रथम होणार आहे. असे हे अभूतपूर्व काम आपल्या सर्वांच्या मदतीने साकारण्यात आपल्याला यश आले असल्याचे भुसे यांनी बोलताना स्पष्ट केले.
आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी, गोरगरीब महिलांनादेखील चांगले उपचार मिळावेत या दृष्टिकोनातून शहरात महिला, बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. मोठ्या शहरात खासगी हॉस्पिटल नसेल असे हे अत्याधुनिक रुग्णालय महिलांच्या सेवेत रुजू झाले आहे. प्रसूतीसाठी 50 हजारांपर्यंत खर्च येतो, मात्र या रुग्णालयात भगिनींना एक रुपया देखील खर्च येणार नसल्याचे स्पष्ट करत भुसे यांनी रुग्णालय सुरू होताच येथील वैद्यकीय सुविधेचा शेकडो महिलांनी लाभ घेतला असल्याचे सांगितले.
विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी व इतर सर्वसामान्यांना मिळावा या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न राहिले आहे. यामुळे पीकविम्याचा निधी जिल्ह्याला 850 कोटी रुपये मिळाला. त्यात मालेगाव तालुक्याला 164 कोटी रुपयांचा निधी शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती देत भुसे म्हणाले, आज तालुक्यात सर्वाधिक 71 हजार लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे. तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी महायुती सरकारने तीन हजार घरे मंजूर केली आहेत. त्यामुळे एकही आदिवासी बांधव पाचटच्या घरात राहणार नाही. नार-पार- गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी महायुती सरकारने 7 हजार 500 कोटी रुपये निधी मंजूर केला असून याअंतर्गत 1 लाख 25 हजार क्षेत्राला 10 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याने सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यावर सर्वप्रथम राज्यातील शेतकर्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची घोषणा केली असल्याचे भुसे यांनी सांगितले.
विरोधक म्हणतात, दादा भुसेंचा दुबई, गोव्यात बंगला आहे. त्यांना 10 वाजेनंतर फक्त गोवा, दुबई दिसते. दुसरा भाऊ म्हणतो, मला काय दिले आणि तुला काय दिले, अशा पद्धतीने प्रचार खालच्या पातळीवर जाऊन अरे-कारेची भाषा केली जात आहे. दोन-तीन वर्षांपर्यंत तुम्ही दादा भुसेचे गाणे म्हणायचे. आता अचानक काय झाले की भुसे वाईट झाला. या दोघांची कुस्ती सुरू आहे. एकाने दुसर्याला स्पॉन्सर करून उभे केले आहे. दादा भुसेंचे मत खाण्यासाठी. मला भेटायला कोणाचीही चिठ्ठी लागत नाही. सकाळी 8 वाजता आपले काम सुरू होते. जनतेला एकच विनंती आहे आपण सर्वांनी मिळून मालेगावचे नाव मोठे केले आहे. काही लोकांना येथे अशांतता व गुंडगिरी आणायची आहे आणि आपण ते होऊ देत नाही म्हणून आपल्यावर खोटेनाटे आरोप करत असल्याची टीका दादा भुसे यांनी यावेळी केली.