मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Malegaon NMC Election) आज (मंगळवारी) फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असताना देखील काल (सोमवारी) १६२ इच्छुकांनी २६१ नामांकन अर्जाची सातही निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून खरेदी केली. पाच दिवसांत ८८० इच्छुकांनी १,६४२ नामांकन अर्ज खरेदी केल्याने शहरात अर्ज खरेदी चर्चेचा विषय बनला आहे. माजी उपमहापौरांसह मातब्बर इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत ९२ नामांकन अर्ज दाखल केले. आज दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने मोठ्या प्रमाणात नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत.
महापालिकेच्या २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मंगळवारी (दि.३०) नामांकन अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना देखील १६२ इच्छुकांतर्फे २६१ नामांकन अर्जाची खरेदी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून केली गेली. तसेच सोमवार (दि.२९) चा मुहूर्त साधत माजी उपमहापौर सखाराम घोडके, भाजप (BJP) महानगरप्रमुख देवीदास पाटील, समाजवादी पार्टी महानगरप्रमुख शानेहिंद निहाल अहमद यांच्यासह नीलेश काकडे, दीपक पवार, संगीता दीपक पवार, माजी नगरसेवक विजय देवरे, दीपाली विवेक वारूळे, प्रियंका नीलेश जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, माजी विरोधी पक्षनेते मधुकर देवरे, विजया सुरेश काळे, मोहिनी प्रमोद पाटील, शेख जावीद शेख अनीस, इरफान अली अहमद बेग, अब्दुल बाकी मोहंमद इस्माईल, मोहंमद मुस्तकीम मोहंमद मुस्तफा, शेख जलील शेख शफी, मोहंमद अमीन मोहंमद फारूक, रिजवान खान अमानुल्ला खान, माया भरत चव्हाण, शेख रफिक शेख अफजल, अमीन खान शब्बीर खान, डॉ. खालीद परवेज आदींसह विविध पक्षांच्या मातब्बर इच्छुकांनी आपल्या प्रभागांतर्गत असलेल्या सातही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात शक्तिप्रदर्शन करत आपले नामांकन अर्ज दाखल केले.
काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) समर्थक कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने निवडणूक कार्यालय गाठत आपले नामांकन अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. शनिवारी चार इच्छुकांनी सहा नामांकन अर्ज दाखल केले होते. आज ९२ अर्ज प्राप्त झाल्याने दाखल झालेल्या नामांकन अर्जाची संख्या ९६ वर पोहोचली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यालयांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यास्तव निवडणूक कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उमेदवार निश्चितीकडे लक्ष
बंडखोरी टाळण्यासाठी भाजप-शिवसेनेतर्फे मंगळवारी सकाळी अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर हे उमेदवार आपले नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीतर्फेदेखील मंगळवारीच उमेदवारांच्या नावाची निश्चिती होऊन एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे भाजप, सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी श.प. तसेच रिपाइं, वंचित आघाडीतर्फे कुणाला पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले जातात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
महायुती फिस्कटली, भाजप-शिवसेना स्वबळावर
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने सोमवारी रात्री महायुती होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मालेगावी भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या वृत्ताला महानगरप्रमुख देवा पाटील यांनी दुजोरा दिला. गत काही दिवसांपासून मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी हिंदूबहुल भागातील पाच प्रभागातील २० जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजप यांच्यात बैठकांचे सत्र सुरू होते.मात्र, भाजपकडून आठ जागा मागण्यात येत होत्या तर शिवसेनेकडून १४-६ हा जागा वाटपाचा फार्म्युला देण्यात येत होता. यात मालेगावी महायुतीत शिवसेना स्वतःला मोठा भाऊ समजत होता. तर भाजपकडून आम्ही राज्यात मोठा भाऊ असल्याचे सांगत जादा जागा मागण्याचा आग्रह धरला जात होता. मात्र, आता मालेगाव महापालिकेत महायुती फिस्कटली असून, तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत .




