Saturday, July 27, 2024
Homeनगरमालुंजा ग्रामस्थांचा वाळू डेपोला विरोध

मालुंजा ग्रामस्थांचा वाळू डेपोला विरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रातील प्रस्तावित शासकीय वाळू डेपोला ग्रामस्थांनी एकमुखी विरोध केला आहे. त्यामुळे मालुंजा बुद्रुक येथील वाळू डेपोची ई-निविदा रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.

- Advertisement -

याबाबत सरपंच अच्युतराव बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेऊन वाळू डेपोला विरोध करून ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. मालुंजा बुद्रुक येथे शासकीय वाळू डेपो उभारला जाणार असून त्याबाबतची निविदा नुकतीच काढण्यात आल्याचे समजते. मात्र, याआधीही मालुंजा, लाडगाव येथील ग्रामस्थांनी या परिसरातील वाळू उपसण्यास व येथे वाळू डेपो उभारणीस विरोध केला आहे.

यासाठी दि.22 जून 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वाळू लिलावास विरोध केला. वाळू लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने जा.क्र.गौ.ख./कार्य/4क/409/2023 अहमदनगर दि.28 जून 2023 रोजी अन्वये वाळू डेपोसाठी निविदा काढली आहे. ही निविदा तातडीने रद्द करण्यात यावी, यासाठी गावकर्‍यांच्या सह्यानिशी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

सरपंच श्री. बडाख यांनी म्हटले आहे की, ठरलेल्या वाळूच्या लिलावापेक्षा लिलावधारक कित्येक पटीने जास्त वाळू उपसा करतात. या वाळू उपशामुळे मालुंजा व परिसरातील शेती उद्ध्वस्त होणार आहे. नदीपात्रालगत मालुंजा व लाडगावला पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी व पाईपलाईन आहेत. या वाळू उपशामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम हेणार असून पाणी प्रदूषित होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर मालुंजा, लाडगाव व परिसरातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत.

निवेदनावर अच्युतराव बडाख, प्रविण भालेकर, संतोष गायकवाड, अशोक भुजाडी, निलेश बडाख, संजय बडाख, गणेश जगताप, राजेंद्र बडाख, सोपान बडाख, दत्तात्रय बडाख, सोपान चव्हाण, रामचंद्र बडाख, वसंत कलंके, किरण गायकवाड, रोहित परदेशी आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या