संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण देशातील जनतेला दुःख झाले आहे. भाजपाने राजकीय इव्हेंटसाठी महाराजांचा पुतळा उभारला गेला होता.पंतप्रधान व भाजपने मागितलेली माफी ही फक्त निवडणुका जवळ आल्याने असून हा गुन्हा असल्याने याला जनता माफ करणार नाही, असे परखड काँग्रेस पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. संगमनेर येथील निवासस्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे श्रद्धास्थान आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली ती फक्त निवडणुका जवळ आल्याने त्यांची श्रद्धा, आस्था प्रेम खोटे आहे. माफी मागितली त्यातही राजकारण केले.
महाराजांची आणि सावरकरांची तुलना कशी होऊ शकते? असा सवाल करताना अवघ्या आठ महिन्यांत पुतळा पडतो आहे. संपूर्ण देश दु:खी होतो आहे. भाजपा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करते. या पुतळा उभारणीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. अनेकांना मलिदा वाटला. पुण्यामध्ये 100 वर्षे झाली तरी महाराजांचा पुतळा शाबूत आहे. तर चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा ऊन, वारा, पाऊस आणि वादळात उभा आहे. शेकडो वर्षे झाली गडकिल्ले मजबूत आहेत. महाराजांप्रती भाजपचे प्रेम, श्रद्धा खोटी असून ते सत्तेसाठी हापापलेले आहेत. आमची महाराजांवर अंत:करणापासून श्रद्धा असल्याने या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे. महायुतीचे आंदोलन हे नाटक आहे. पुतळा कोसळण्यामधील गुन्हेगार व त्यांना संरक्षण देणारे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
महाविकास आघाडीला मोठा जनाधार असून येणार्या निवडणुकीमध्ये 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील हा मोठा इतिहास घडणार आहे. महायुतीबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठा रोष आहे. महायुतीचा भरोसा फक्त आता एका योजनेवर आहे. परंतु महाराष्ट्रातील आमच्या भगिनी हुशार आहेत त्या फसणार नाहीत. बदलापूर घटनेचे काय झाले हा प्रश्न विचारणार आहेत. खरेतर बदलापूर आणि पुतळा कोसळल्यानंतर सरकारने राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, सत्तालोलुप अशी ही मंडळी आहे. एक एक दिवसाची सत्ता यांना हवी आहे. निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. महायुतीमध्येच आता मोठा संघर्ष होत असून त्यांचा संघर्ष खूपच टोकाला जाणार आहे. आत्ताच त्यांच्या नेत्यांमध्ये एकमेकाची तोंड न पाहणे किंवा ओकारी येणे अशी चर्चा होत आहे अशाबद्दल न बोलणे बरे. भाजपचे लोक सत्तेसाठी काहीही करतात असे सांगताना आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.