सिंधुदुर्ग | Sindhudurga
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात निलेश राणे विरुद्ध भाजपा असे चित्र रंगले आहे. निलेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत रोकड जप्त केल्यानंतर पेटलेला वाद अद्याप शमलेला नाही. त्यातच ऐन मतदानाच्या आदल्या रात्री मालवणमध्ये एका गाडीतून रोकड मिळाली आहे. प्रचार संपल्यानंतर मालवणमध्ये भाजपचा रात्रीचा पैसे वाटपाचा खेळ सुरु असल्याचे आमदार निलेश राणे यांनी उघड केले आहे. भाजपच्या या पदाधिकाऱ्यांवर, विना नंबर प्लेट असलेल्या कारवर पोलीस काय कारवाई करतात, ते पाहिल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका आमदार राणे यांनी घेतली, यामुळे रात्रभर तणावाचे वातावरण होते.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आरोप केला आहे की, मालवण पोलिसांनी नाकाबंदीमध्ये रोख रक्कम वाटप करताना एक गाडी आणि काही लोकांना पकडले. त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनमध्ये विना नंबर प्लेटच्या गाडीतून भाजपचे दोन पदाधिकारी आले. त्याचवेळी निलेश राणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यामुळे भाजप पदाधिकारी गाडी सोडून पळून गेले. या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशनमध्येच ठाण मांडून बसणार असल्याचे निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा जंगी सामना रंगला आहे. मालवणचे शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमधील संघर्ष या निवडणूक काळात अनेकदा समोर आला. मतदानाच्या आदल्या रात्री मालवणमध्ये नाकाबंदीत पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोख रक्कम पकडली.
1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद झाला. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकार यांच्या MH-07- AS-6960 क्रमांकाच्या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. मालवण पोलिसांनी ही गाडी आणि भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आणि मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणले. यांना सोडवण्यासाठी मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे हे विना नंबर प्लेटची कार घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्याकडून पैसे वाटपाचे हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु होता.
त्याच दरम्यान, शिवसेनेचे (शिंदे) आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पकडलेल्या भाजप पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
आमदार निलेश राणे यांनी मध्यरात्री आक्रमक पवित्रा घेतला. निवडणुकीसाठीचा प्रचार रात्री १० वाजता थांबला. त्याच रात्री पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये पैसे असलेली कार पोलिसांच्या हाती लागते. मात्र त्या गाडीवर आणि गाडीतील लोकांवर कोणतीही कारवाई का होत नाही, असा सवाल निलेश राणे यांनी केला. ते म्हणाले की, लाईट बंद करुन पोलीस काय करत होते. तुम्ही रात्री १२ वाजून १० मिनिटांनी गाडी पोलीस स्टेशनला आणली, मी सव्वा वाजता पोलीस ठाण्यात आलो, तोपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती. पंचनामा झाला नव्हता, निवडणूक अधिकारी आले नव्हते. मी आल्यानंतर निवडणूक अधिकारी आले. भाजपच्या लोकांना जो सोडवायला आला होता, त्या गाडीला कोणतीही नंबरप्लेट नव्हती. या गाडीच्या आतमध्ये भाजपचा गमछा होता. या गाडीवर कारवाई करावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.




