मुंबई | Mumbai
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने १६ पानी अहवाल, राज्य सरकारकडे सादर केला आहे. गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळल्याचे या अहवालामध्य नमूद करण्यात आले आहे.
चौकशी अहवालात काय म्हंटले?
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता. या घटनेवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान या घटनेवरुन राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.
मालवण छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण यामध्ये समोर आले आहे. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता तसेच कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. पुतळा दुर्घटनेला एक महिला पूर्ण झाला असून चौकशी समितीने १६ पानी अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिस चौकशी होणार आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी पुरावे पोलिसांकडे सादर करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
राजकोट किल्ल्यावर आता आता छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की १०० वर्ष याला काहीच होणार नाही अशी माहित सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे. गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी जे निकष ठेवले होते, त्याच निकषांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा