Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधममतांचा फटका काँग्रेसलाच जास्त

ममतांचा फटका काँग्रेसलाच जास्त

तीव्र भाजप विरोधामुळे ममता बॅनर्जी भाजपला पर्याय ठरू शकतील असा कुणाचाही गैरसमज होण्याची शक्यता आहे; परंतु तसे होण्याची शक्यता फारच कमी आहे. ममतादीदी तृणमूल काँग्रेसला ज्या पद्धतीने राष्ट्रीय पक्ष बनवत आहेत त्यावरून त्या भाजपच्या कडव्या विरोधक म्हणून प्रतिमा तयार करत असल्या तरी प्रत्यक्षात ममतांमुळे भाजपपेक्षा काँग्रेससह अन्य पक्षांचेच जास्त नुकसान होणार आहे.

सौरभ बॅनर्जी

काँग्रेसमधून बाहेर पडणारे नेते अन्य पक्षांचे फारसे नुकसान करत नाहीत, तर काँग्रेसचेच नुकसान करतात, हा अनुभव वारंवार आला आहे. जनमानसातल्या नेत्यांना डावलल्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली तरी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांच्या ही बाब लक्षात येत नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, सर्वानंद सोनोवाल, माधवराव शिंदे, राजेश पायलट, पी. ए. संगमा आदी अनेक नेत्यांवर दिल्लीच्या दरबारी राजकारण्यांनी काँग्रेस सोडण्याची वेळ आणली. त्यात नेत्यांचे राजकीय नुकसान झाले; परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान पक्षाचे झाले.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममतादीदींपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु दीदींनी मैदान मारले. ते पाहिले तर त्यात लढत भाजप आणि ममतांमध्ये झाली. दोन बड्यांच्या युद्धात छोटे नामोहरम होतात, तसे तिथे डाव्यांचे आणि काँग्रेसचे झाले. विरोधी पक्षनेतेपद तर दूर राहिले, विधानसभेतले या दोन पक्षांचे अस्तित्व संपले. दीदींनी पश्चिम बंगाल राखलेच पण पूर्वीपेक्षा जादा जागा मिळवल्या. त्यांच्या हॅट्ट्रिकमुळे भाजपचा विजयाचा वारू रोखला असला तरी भाजपच्या आमदारांची संख्या तीनवरून 75 पर्यंत गेली. हे यश 25 पट जादा आहे. लोकसभेच्या यशाच्या तुलनेत ते कमी असले तरी ते नगण्य नाही.

पश्चिम बंगालमध्ये तिसर्‍यांदा विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांची नजर राष्ट्रीय राजकारणावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधकांचा चेहरा बनण्यास त्या उत्सुक आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सावरत नाही. सोनिया यांच्या व्यूहनीतीला आता मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या नेतृत्वाला कोण पर्याय देऊ शकतो, याची चाचपणी सुरू झाली आहे. पूर्वी नितीशकुमार यांचे नाव घेतले जात होते. परंतु तेच नंतर भाजपच्या कच्छपि लागले. नंतर के. चंद्रशेखर राव यांचे नाव पुढे येत होते. परंतु त्यांच्या नावालाही मर्यादा आल्या. शरद पवार वगैरे नेत्यांनी मध्यंतरी तिसर्‍या आघाडीची चाचपणी करून पाहिली. परंतु नंतर असे काही नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ममतादीदींनी आता सुरू केलेली मोेहीम नक्कीच लक्षवेधी आहे. भाजपला त्या पर्याय देऊ शकतात की नाही, हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवला तरी त्या काँग्रेसचे मात्र नुकसान करू शकतात एवढे नक्की.

पक्ष विस्तारासाठी ममतादीदींनी निवडलेल्या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे, हे स्पष्ट दिसते. काही ठिकाणी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. आगामी काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. तिथे भाजपने सत्ता राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस हातपाय पसरत आहे. ममतादीदींनी दिल्ली, गोवा आणि मेघालयात काँग्रेसमध्ये फोडाफोड केली आहे. दोन माजी मुख्यमंत्री, एक क्रिकेटपटू ममता यांच्या गळाला लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तृणमूल काँग्रेसने वरुण गांधी यांच्यासाठी जाळे टाकले आहे. ममता यांच्या हालचालींमुळे काँग्रेसला सर्वाधिक त्रास झाला आहे, कारण त्या काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच गेल्या दशकभरात ममता यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट न घेण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसांवर नजर टाकली तर गोव्यापासून उत्तर प्रदेश आणि हरियाणापर्यंत ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला आहे असे दिसते. संयुक्त जनता दलाचे माजी नेते पवन वर्मा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये समावेश करण्यात आला. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही ममता यांनी भेट घेतली. आंदोलन करून टाटांचा सिंगूर प्रकल्प पळवून लावणार्‍या ममतादीदी आता उद्योजकांना पायघड्या घालायला लागल्या आहेत. मुंबईचा त्यांचा दौरा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि पुढील वर्षी होणार्‍या बिझनेस कॉन्फरन्सच्या संदर्भात होता.

असे असले तरी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी हितगुज करण्यासाठी आल्या म्हटल्यावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणे साहजिक आहे, कारण काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पुढे जायचे आहे. ममतांना ते मान्य नाही. ममतादीदी भाजपच्या नेत्यांना स्वतःच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्यांचा खरा धोका भाजपला कमी आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये काँग्रेसला धक्का दिला. यानंतर काँग्रेसला पुढचा धक्का गोव्यात बसला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसचा त्याग करून ममतांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजेशपती त्रिपाठी आणि ललितेशपती त्रिपाठी यांच्यानंतर कीर्ती आझाद, हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये समावेश करून त्यांनी काँग्रेसला आणखी धक्का दिला. ऑगस्टच्या सुरुवातीला त्रिपुरातले युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शंतनू साहा यांच्यासह अनेक नेतेही तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ममता शांत बसलेल्या नाहीत. पक्षाच्या विस्तारात त्या सतत व्यस्त आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधल्या भाजप नेते आणि आमदारांवर त्याचप्रमाणे इतर राज्यांमधल्या काँग्रेस नेते आणि आमदारांवर जाळे टाकून तृणमूल काँग्रेस वााढवत आहेत. अलीकडेच मेघालयातले काँग्रेसचे बारा आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. ममतांना निवडणूक न लढवता मिळालेले हे यश स्पृहणीय आहे. विरोधी पक्षनेतेपदही तृणमूल काँग्रेसकडे आले आहे. तृणमूल काँग्रेस भारतातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेऊ शकेल का? याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी याबाबत कोणताही स्पष्ट दावा करत नाहीत. परंतु ताजी विस्तारवादी धोरणे त्यांची महत्त्वाकांक्षा दर्शवतात. ठाकरे आणि पवार यांना भेटल्यानंतर ममतादीदी पुढच्या महिन्यात राजस्थानला जाणार आहेत. 2024 च्या निवडणुका अजून दूर आहेत. 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची कामगिरी सर्वोत्तम होती. तेव्हा या पक्षाने 39.8 टक्के मतांसह पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 पैकी 34 जागा जिंकल्या होत्या.

2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी 48.5 टक्के होती. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेच्या 52 जागा जिंकण्यात यश मिळवले. त्यापैकी 31 जागा फक्त तीन राज्यांमधून आल्या आहेत. केरळमध्ये 15, पंजाबमध्ये आठ आणि तामिळनाडूमध्ये आठ अशी आकडेवारी आहे. 2021 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली. तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे भवितव्य द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) सोबतच्या जागावाटपाच्या सूत्रावर अवलंबून असेल. पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंग यांच्या हकालपट्टीमुळे काँग्रेसला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पूर्वीइतक्या जागा मिळतील की नाही, याबाबत साशंकता आहे. महाराष्ट्रात काही जागा वाढल्या तरी त्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील. 2019 मध्ये काँग्रेसने आसाममध्ये लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. तथापि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटसोबत काँग्रेसची युती सपशेल अपयशी ठरली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढल्या तर काँग्रेसचे विरोधी पक्षाचे स्थानही जाऊ शकते.

या पार्श्वभूमीवर ममतादीदींचा तृणमूल काँग्रेस पक्ष भाजपविरोधात रान उठवत असला तरी प्रत्यक्षात देशभर काँग्रेसचा सफाया घडवून आणत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

सौरभ बॅनर्जी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या