शिरवाडे वाकद | वार्ताहर
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दि.१२ सप्टेंबर रोजी निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयीत इसम दहशत पसरविण्याचे उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना दिसून आला.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचुन संशयीत किशोर दत्तु शिंदे, वय २४, रा.जोशीवाडी, ता. सिन्नर यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचे विरूध्द सायखेडा पोलीस ठाणे गु.र.नं २११/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, स.पो.नि.संदेश पवार, पो.हवा नवनाथ सानप, हेमंत गरूड, विनोद टिळे, मेघराज जाधव, संदिप नागपुरे, सुधाकर बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली.
आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलीस ठाणेस संपर्क करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा