मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ५ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञान व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारु आणि मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. अखेर धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे.
एटीएसने दिलेल्या माहिती नुसार, “पलाश बोस असे आरोपीचे नाव असून त्याला कोलकात्यातल्या टोलेगंज भागातून अटक करण्यात आली आहे. अटक करणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. याच व्यक्तीने ‘मातोश्री’सह गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमक्या दिल्या होत्या. त्याने या धमक्या का दिल्या, त्याची चौकशी सुरू आहे.
धमकीसाठी इंटरनॅशल सिमकार्डचा वापर
दरम्यान, धमकीसाठी त्याने इंटरनॅशल सिमकार्डचा वापर केला होता. धमकी देणारी व्यक्ती दूबईत राहत होता, हे तपासात उघड झाले आहे. याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या व्यक्तीला कोलकातामधून मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे एटीएसने सांगितले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
कोण आहे आरोपी?
या आरोपीची प्राथमिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा केल्याचं कबुल केले आहे. आरोपी हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून नोकरीसाठी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ तो दुबईमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. आरोपीचे दुबई येथील वास्तव्य, गुन्हेगारी हालचाली आणि धागेदोऱ्यांबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.