Thursday, August 27, 2026
Homeक्राईमCrime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लुटणारी टोळी जेरबंद

Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लुटणारी टोळी जेरबंद

पाथर्डी मिरजगावातील दोन गुन्हे उघडकीस || 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृध्द महिलांना कारमध्ये बसवून त्यांना धमकावत मंगळसूत्र व सोन्याचे दागिने लुटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एक महिला व एका पुरूषाला अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत मिरजगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुटीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

- Advertisement -

मिरजगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. 20 ऑगस्ट रोजी व्दारकाबाई उत्तम डाडर (वय 65, रा. नागलवाडी, ता. कर्जत) या मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी एका पुरूषाने व महिलेने चारचाकी वाहनातून मिरजगाव येथे सोडण्याचे सांगून त्यांना कारमध्ये बसविले. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी डाडर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर कारमधून खाली ढकलून संशयित पसार झाले होते. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील उघडकीस न आलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, जालींदर साखरे, प्रशांत राठोड, ज्योती शिंदे यांचे तपास पथक तयार करण्यात आले.

दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार मिरजगावचा गुन्हा लक्ष्मण जामदार याने कोमल नन्नवरे हिच्यासोबत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोमल भाऊसाहेब नन्नवरे (वय 30, रा. डावरवाडी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिला तारकपूर बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. तिच्या साथीदाराचा शोध घेत असताना तो कारमधून सोलापूर रोडने अहिल्यानगरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोंबडीवाला मळा परिसरात सापळा रचून लक्ष्मण मोहन जामदार (वय 26, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले. संशयितांकडून कार, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 8 लाख 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित आरोपींची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नागलवाडी येथील वृध्द महिलेला कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच याच पध्दतीने पाथर्डी ते अहिल्यानगर रस्त्यावर पाथर्डीजवळ एका वृध्द महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले आणि तिला कारमधून खाली ढकलून दिल्याची माहितीही आरोपींनी दिली.

ताज्या बातम्या

Bhandardara : अखेर भंडारदरा, निळवंडे 100 टक्के भरले!

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा आणि 8334 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण अखेर काठोकाठ भरले असून या दोन्ही धरणांतून...