मंगेशकर कुटुंबियांचे नाशिकवर विलक्षण प्रेम होते. ते प्रसंगोपात व्यक्तही होत असे. लतादीदींच्या निर्वाणामुळे ते दोन विशेष प्रसंग हजारो नाशिककरांना आठवले असतील.
पहिला प्रसंग 1999 सालचा आहे. निमित्त होते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे. तारीख होती 24 एप्रिल.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. 1999 सालचा हा पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक आणि प्रख्यात वक्ते रामभाऊ शेवाळकर यांना जाहीर झाला होता. त्याचे कार्यस्थळ म्हणून मंगेशकर कुटुंबियांनी नाशिकची निवड केली होती. असे करून त्यांनी नाशिकबद्दलची आपली आपुलकी व्यक्त केली, असे आजही नाशिककर मानतात.
पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी मंगेशकर आणि शेवाळकर कुटुंबीय नाशिकला आले. मंगेशकर कुटुंबियांचा मुक्काम हॉटेल ताजमध्ये होता. शेवाळकर कुटुंबियांची देखील व्यवस्था ताजमध्येच केल्याचे त्यांना कळवले होते. तथापि शेवाळकरांनी, नाशिकमध्ये माझा नेहमीचा पत्ता ठरलेला आहे. त्याची चिंता करू नये, असे मंगेशकर कुटुंबियांना कळवले असावे आणि ते बाबूशेठ (देवकिसनजी) सारडा यांच्याकडे मुक्कामाला होते.
कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होता. पण शेवाळकरांना दुपारी जेवणानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना त्रास होऊ लागला. त्वरित डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉ. कुणाल गुप्ते त्यांच्या मदतनीस डॉक्टरांना घेऊन त्वरित आले. त्यांनी शेवाळकरांची प्रकृती तपासली आणि तो हृदयविकाराचा सौम्य झटका असल्याचे निदान केले. सर्वांची काहीशी तारांबळ उडाली. कारण शेवाळकरांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाला जाऊ नये असे डॉक्टरांचे मत होते. त्यावेळी डॉ. गुप्ते यांनी शेवाळकरांचे नागपूरचे पारिवारिक डॉक्टर माहूरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना झाल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. नाशिकला जाऊनही कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही याचा धक्का रामभाऊंना जास्त जाणवेल असा निष्कर्ष दोन्ही डॉक्टरांनी काढला असावा. आवश्यक ती दक्षता घेऊन रामभाऊंनी कार्यक्रमाला जावे आणि पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ भाषण करू नये, कार्यक्रमस्थळी एक जरी पायरी असेल तर तीसुद्धा चढायची नाही. त्यासाठी चाकाच्या खुर्चीचा वापर करायचा असे काही निर्बंध डॉक्टरांनी घातले. याउपरही काही त्रास जाणवू शकतो हे गृहीत धरून कार्यक्रम स्थळी एक रुग्णवाहिका तयार ठेवावी, असेही डॉक्टरांनी सुचवले आणि पुढे सगळे डॉक्टरांच्या सूचनेबरहुकूम घडले. त्यांच्या अटी पाळूनच रामभाऊ कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी मोजून पाच मिनिटेच श्रोत्यांशी संवाद साधला होता.
लता मंगेशकर यांच्या हस्ते रामभाऊंना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. तर शेवाळकर कुटुंबियांच्या वतीने रामभाऊंनी लताताईंना संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा भेट दिली आणि हा सोहळा उत्तमरीतीने पार पडला.
हा कार्यक्रम जयप्रकाश जातेगावकरांच्या मेहनतीने यशस्वी रितीने पूर्ण झाल्याबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी त्यांना धन्यवाद दिले.
प्रसंग दुसरा
26 जानेवारी 2006 चा. नाशिकच्या सी न्यूज वाहिनीने शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला देखील लता मंगेशकर आणि रामभाऊ शेवाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या दिवशीची सायंकाळ नाशिककरांच्या जीवनातील अविस्मरणीय सायंकाळ ठरली. कारण लता मंगेशकर यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे त्यांचे अजरामर गीत गाऊन शहीद जवानांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. त्यांच्या स्वरांनी उपस्थित श्रोते भारुन गेले होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामभाऊ शेवाळकर यांनीही केलेले भाषण अमोघ वक्तृत्वाचा अप्रतिम नमुना होते. रामभाऊ शेवाळकर यांच्या हस्ते लतादीदींचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारासाठी येवल्यातून खास पैठणी पद्धतीने शाल तयार करून घेण्यात आली होती. ही शाल पाहून लतादीदी हरखून गेल्या होत्या.
25 एप्रिल 1999 रोजी वसंत व्याख्यानमालेच्या 78 व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा शुभारंभही लतादीदींच्या हस्ते संपन्न झाला होता.
अशा दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मंगेशकर कुटुंबियांनी नाशिकचीच निवड करावी यातूनच मंगेशकर कुटुंबियांनी नाशिकवरचा आपला विशेष लोभ व्यक्त केला. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या अनेकांना लतादीदींच्या अस्थी विसर्जनाच्या निमित्ताने याची आठवण झाली असेल.