नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. जिरीबामला पाठवलेल्या या आगाऊ सुरक्षा पथकावर हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह मंगळवारी जिरीबामला भेट देण्यासाठी जाणार आहे. त्या आधी हे पथक जिरीबामला दाखल झाले होते.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग-५३ वर कोटलेन गावाजवळ अजूनही गोळीबार सुरू आहे. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्य सीआयडीचे पोलीस, सीआयएसएफचे जवान आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहे. यातील एका जखमी जवानाला उपचारासाठी इम्फाळला पाठवण्यात आले आहे.
जिरीबाम येथे मागील २ दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री एन बीरेन सिंह मंगळवारी जिरीबाम दौऱ्यावर जाणार होते. त्या आधीच, सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-३७ वर (इंफाळ-सिलचर मार्गे जिरिबाम) कांगपोकपी जिल्ह्यातील कोटलाने जवळ टी लैजांग गावात हा हल्ला झाला. यादरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. सध्या पोलीस कमांडो आणि आसाम रायफल्स (एआर) यांच्या संयुक्त पथकाकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
जिरीबाममध्ये उसळला होता हिंसाचार
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी दोन पोलीस चौक्या, वन विभागाचे एक कार्यालय आणि किमान ७० घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अतिरेक्यांच्या या हल्ल्यानंतर तणाव वाढला असून पोलीस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली. संशयित अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून जिरीबाममध्ये हिंसाचार सुरू आहे.
अतिरेक्यांनी शनिवारी पोलीस चौक्या, घरे यांना लक्ष्य केले. अतिरेक्यांनी लामताई खुनौ, दिबोंग खुनौ, ननखल आणि बेगरा या गावांतील ७० हून अधिक घरे जाळली. दरम्यान, शुक्रवारी जिरीबामच्या परिघीय भागातून सुमारे २३९ मेईतेई नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्ह्यातील एका बहु-क्रीडा संकुलात नव्याने उभारलेल्या मदत शिबिरात हलविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिरीबाम हे राज्याची राजधानी इंफाळपासून 220 किमी अंतरावर आसामच्या सीमेला लागून असलेला प्रदेश आहे. जो महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग-37 ने जातो. आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या असंख्य कुकी गावांच्या उपस्थितीने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.