Friday, October 18, 2024
Homeदेश विदेशमणिपूर पुन्हा धुमसतयं; ३ जणांचा मृत्यू, इंटरनेट सेवाही बंद, संचारबंदी लागू

मणिपूर पुन्हा धुमसतयं; ३ जणांचा मृत्यू, इंटरनेट सेवाही बंद, संचारबंदी लागू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशातील उत्तर पूर्व दिशेकडील मणिपूर राज्यात पु्न्हा एकदा हिंसाचार उसळलाय. राज्यातील तीन जिल्ह्यात संचार बंदी लागू केल्यानंतर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामुळे मणिपूर सरकारकडून ५ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे तर तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे.

इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि थौबल तीन जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दरम्यान राज्यात मागील दोन दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे.या २ दिवसांत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर तीन जिल्ह्यांच्या प्रशासनाने मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केलेत. संचारबंदी का केली यामागे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे कारण सांगितले.

- Advertisement -

मणिपूर सरकारच्या गृह विभागानं मंगळवारी दुपारी ३ वाजल्यापासून राज्यात लीज लाईन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा तात्पुरती खंडीत करण्याचा आदेश जारी केला आहे.

केंद्राने मणिपूरमध्ये CRPF बटालियन तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात जवळपास २००० जवान आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत, या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन ते राजभवनाकडे कूच करत होते.

यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफला दंगल नियंत्रण वाहनांसह पाचारण करण्यात आले आहे. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांना मागे हटण्यास भाग पाडले. जमावाला पांगवण्यासाठी दुसऱ्या बाजूने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मणिपूर सरकारने मंगळवारी संध्याकाळी नव्याने अध्यादेश जारी केला असून त्यात म्हंटले आहे की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने राज्यभरात पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या