Wednesday, October 21, 2026
HomeराजकीयManoj Jarange : एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले, मनोज...

Manoj Jarange : एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

बीड । Beed

विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडच्या ऐतिहासिक नारायण गडावरील दसरा मेळावा यंदा प्रचंड राजकीय संघर्षाचा आणि खळबळजनक आरोपांचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी या मेळाव्यातून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत हल्लाबोल केला आहे. “तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये आणले आणि श्रीकांत शिंदेंमार्फत ते मला दिले, असे दिल्लीतील भाजप नेत्यांना सांगितले का?” असा थेट सवाल उपस्थित करत जरांगे-पाटलांनी राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

नारायण गडावरील जनसमुदायासमोर बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, “एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही माझ्याबद्दल दिल्लीत भाजपच्या लोकांना काय सांगितले? मनोज जरांगेंना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये पोहोचवले आहेत, अशी कुजबूज दिल्लीत सुरू आहे. तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिलेत का? जर तुम्ही मला दिले नसतील, तर भाजप तुम्हाला संपवतोय की तुम्ही मला संपवताय? याचा छडा मी लावल्याशिवाय राहणार नाही.”

तसेच, “तुम्ही मला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत याचे उत्तर द्या. मी जर उद्या सकाळी एका आवाजात मराठ्यांना म्हटले की प्रत्येकाने १०० रुपये द्या, तर २४ तासांत माझ्याकडे २५०० कोटी रुपये जमा होतील. हा काही लहान विषय नाही शिंदेसाहेब… तुमचा आणि माझा सामना तीन महिन्यांनंतर होईल,” असा जाहीर इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

केवळ राजकीय आरोपच नव्हे, तर राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांवरही जरांगे यांनी आक्रमक भूमिका मांडली. सध्या शेतकरी अत्यंत संकटात असून आगामी काळात ही परिस्थिती अधिक भयानक होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या ५ हजार रुपयांच्या मदतीचे उपरोधिक गणित मांडताना ते म्हणाले की, “पाच हजार रुपयांची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ८ दिवस शासकीय कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागतील. यात पेट्रोलचे २०० रुपये, येण्या-जाण्याचे २ हजार रुपये आणि जेवणाचे ३२०० रुपये खर्च होतील. हे असले गणित करून बळीराज्याची चेष्टा करू नका.” जीएसटी आपण भरायचा आणि मज्जा दुसऱ्यांनी घ्यायची, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे-पाटलांच्या सरकारकडे ५ प्रमुख मागण्या

१. राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी.
२. सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी.
३. पिक विम्याचे सर्व पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत.
४. शेतकऱ्यांचे रखडलेले सर्व अनुदानाचे पैसे वितरित करावेत.
५. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावोगावी तातडीने चारा छावण्या उभ्या कराव्यात.

ताज्या बातम्या

येत्या दोन-पाच महिन्यांत देशात मोठी गडबड – मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai देशातील जनतेला सरकारच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीबाबत राग आहे. तो राग देशपातळीवरील आंदोलनांच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत...