मुंबई । Mumbai
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा आज माध्यमांशी बोलताना केली.
जरांगे-पाटील म्हणाले की, सरकारकडून वारंवार आश्वासन दिलं गेलं, पण अद्यापही एकही मागणी पूर्ण झालेली नाही. मागील उपोषणावेळी सरकारने चार मागण्या तातडीने मान्य करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, तीन महिने उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता संयमाचा बांध तुटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “आपल्याला समजून घ्यायचं सरकारकडं कारणच उरलेलं नाही. त्यामुळे आता आंदोलनासाठी मुंबईतच जायचं आहे. 28 ऑगस्टला मला मुंबईत सोडायला या, मग तुम्ही परत जा. 29 तारखेला आमरण उपोषण सुरू होईल. हे उपोषण मंत्रालयासमोर किंवा आझाद मैदानावर होईल.”
मनोज जरांगे-पाटील यांनी हे आंदोलन समाजाच्या हक्कासाठी असल्याचं सांगितलं. “मी जे पाऊल उचलतो आहे ते समाजाच्या भल्यासाठी आहे. तुमच्या लेकरा-बाळांच्या भवितव्याची जबाबदारी मी घेतोय. आता मागे हटायचं नाही. आंदोलनाची पुढील दिशा 1 ऑगस्टला जाहीर केली जाईल,” असंही त्यांनी नमूद केलं.
सरकारवर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. “हक्काचं जे आमचं आहे ते द्या. कोणी विरोध केला तरी आम्हाला ते मिळायलाच हवं. सरकारने आमची 100 टक्के फसवणूक केली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की, “29 ऑगस्टपूर्वी तुमची कामं आटपून ठेवा. तुम्ही रुसू नका, माझ्यासोबत ताकदीने उभं राहा. हे आंदोलन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. संयम संपलाय, आता लढावं लागेल.” आजपासूनच आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. “सात कोटी मराठा समाज माझ्यासोबत आहे. मला फक्त मुंबईत सोडायला या, मी एकटाही खंबीरपणे समाजासाठी उभा आहे,” असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे-पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.