जालना । Jalana
मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे यांनी दिली.
दरम्यान, ‘उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातले जाणार नाही. ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल. तसेच सामूहिक आमरण उपोषणाला कोणी बसले नाही, तरी मी बसणार’ असेही मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार आहे.
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारला २५ जानेवारी पर्यंतची वेळ दिली आहे.या तारखेच्या आता आमच्या मागण्या करा नाहीतर सरकारला पश्चाताप होईल, असा इशारा देखील जरांगेंनी देवेंद्र फडणवीस सरकारला दिला आहे.
मराठ्यांनी २५ जानेवारीला अंतरावली सराटीमध्ये यावं. ज्यांना उपोषण करायचे नसेल त्यांनीही यावे आणि पाठिंबा दाखवावा. तसेच आता हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावे. यासाठी गावागावात बैठका घ्या, पत्रिका छापा आणि लोकांमध्ये वाटा. अशाप्रकारे अंतरवाली मधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठ्यांना निमंत्रण द्या. आणि २५ जानेवारीला कुठलेही कार्यक्रम ठेऊ नका, लग्नाची तारीख काढू नका,असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.
सरकारला आता ही शेवटची विनंती आहे. २५ जानेवारीच्या आत आमच्या मागण्या मान्य करा. नाही तर तुम्हाला अवघड जाईल. आणि आम्ही सरकारशी व्यवस्थितच बोलूच. पण २५ जानेवारीनंतर मात्र अपेक्षा भंग झाला तर आम्ही मग सोडणार नाही,असा इशारा देखील जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यासोबत आता आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवाली सोडायचे नाही, त्यामुळे सगळ्या तयारीने यावे, स्वयंपाक करून खाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन जरांगेंनी मराठ्यांना केले आहे.