Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजयेवला पवित्र होणार, डाग पुसणार, भुजबळांचा कार्यक्रम लावणार; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

येवला पवित्र होणार, डाग पुसणार, भुजबळांचा कार्यक्रम लावणार; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप झाला. छगन भुजबळांच्या (chhagan bhujbal) बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं दिमाखात स्वागत झालं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकदाच नादी लागला तर त्याला नाशिक देखील सोडू दिले नाही. शहाणा असेल तर माझ्या नादी लागू नये. येवल्यातील ऐड्याला किंमत देणार नाही, त्याचा कार्यक्रमच लावणार म्हणजे लावणार. येवल्यातील डाग धुतलाच म्हणून समजा, येवला पवित्र होणार, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना मातीत घातले अनेकांना संपवलं. पण, देवेंद्र फडणवीसांना मी वस्ताद भेटलो आहे. फडणवीस साहेब तुम्ही राजकारण करू नका, आरक्षण द्या, नाहीतर भाजपचे मुळासकट आमदार पाडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले होते. या शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि.१३) होत असल्याने, या रॅलीची सुरुवात दुपारी २ वाजता तपोवनातील साधुग्राम प्रवेशद्वार येथून झाली. ही रॅली पुढे सीबीएस येथील सभेच्या ठिकाणी मार्गस्थ झाली.

तपोवनातून निघालेली ही शांतता रॅली पुढे नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, सेवाकुंज, निमाणी, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मार्गे सीबीएस येथील सभास्थळी मार्गस्थ झाली. साधुग्राममध्ये सकाळी दहा वाजेपासून साधुग्राम येथे समाज बांधवांनी जमण्यास सुरुवात केली होती. साधुग्राम प्रवेशद्वार येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच येणाऱ्या समाज बांधवांना नष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.

याठिकाणी भगव्या रंगाच्या टोप्या, उपरणे व भगवे झेंडे यांची विक्री सुरू होती. यासह वाहनांना लावण्याचे स्टिकर यांचे केले जात होते. समाज बांधव पुरुष व महिलांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर एका बाजूला हम सब जरांगे आणि दुसऱ्या बाजूला एक मराठा लाख मराठा असे वाक्य लक्ष वेधून घेत होते. रॅलीत सहभागी झालेल्या समाज बांधवांना शारीरिक त्रास उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा देखील याठिकाणी सज्ज होती. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निफाड व येवला तालुक्यातुन दुपारच्या सुमारास दुचाकी, चारचाकी वरून आलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ही रॅली दाखल होताच काही वेळ संभाजी नगर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या रॅलीत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांचे आकर्षण ठरला होता.
मनोज जरांगे पाटील यांचे तपोवनातील साधुग्राम येथे पावणे दोन वाजेच्या सुमारास आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला लगेचच सुरुवात करण्यात आली.

एक मराठा, लाख मराठा…, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है…, छत्रपती शिवाजी महाराज की जय…, जय जिजाऊ, जय शिवराय…, आरक्षण न देणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय या व अशा आदी घोषणांनी तपोवन परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान, तपोवनात मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र आले होते. या संधीचा फायदा भुरट्या चोरांनी उठवला. अनेकांचे मोबाईल, पाकीट चोरीला गेले. तर महिला व पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळी या चोरट्यांनी हातोहात लांबविल्या असल्याच्या अनेक घटना घडल्या. आडगाव पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या