मुंबई । Mumbai
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे पाटलांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर टीका करताना म्हटले आहे की, “मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.” या आंदोलनाला कोण आर्थिक मदत करत आहे, पेट्रोल-डिझेलचा खर्च कोण उचलत आहे, या सगळ्याची माहिती सरकारकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
नितेश राणेंच्या या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. “तुम्ही स्वतः मराठा असून मराठ्यांची सेवा करायला हवी, त्यांच्यावर आरोप करू नयेत,” असे जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी नितेश राणेंना “चिमणी, चिचुंदरी आणि डुक्कर” अशी उपमा दिली. “तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे बूट किती दिवस चाटणार आहात? कधीतरी गरिबांच्या मदतीला या,” असा सवाल करत त्यांनी राणेंवर जोरदार हल्ला चढवला.
नितेश राणे यांच्यावर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, “नितेश राणेंना मंत्रीपद जाण्याची भीती वाटत आहे. म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “गोरगरीब मराठा समाज वर्गणी काढून आंदोलन चालवत आहे, हेच खरे ९६ कुळी मराठे आहेत. जर ९६ कुळींचे गुण त्यांच्यात असते, तर ते मराठ्यांच्या मदतीला धावून आले असते.”
जरांगे पाटील यांनी आंदोलनाला मिळणाऱ्या मदतीवर स्पष्टीकरण दिले. “आम्ही घरूनच सर्व घेऊन निघालो आहोत. लोक स्वतःहून वर्गणी काढून मदत करत आहेत. हे लोकांच्या कष्टाचे पैसे आहेत. ज्यांनी चोरी केली आहे, त्यांना दुसऱ्यांकडूनही चोरी झाली आहे असेच वाटते,” असे म्हणत त्यांनी नितेश राणे यांच्या आरोपांना खोडून काढले. या शाब्दिक युद्धामुळे मराठा आंदोलनाला एक वेगळे राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे.




