जालना । Jalna
मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात झाली असून शनिवारी पहिल्याच दिवशी उपोषणस्थळी आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी झाली आहे. उपोषणाला सुरूवात करतानाच मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.
सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास एक वर्ष लागलं. एक वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. सरसकट कुणबी प्रमाण द्या. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे, सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत, न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा, आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या, सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या, अशा १० मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या.
यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांच्या हत्येचा उल्लेख केला. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. त्यासाठीही आपल्याला लढायचं आहे असे सांगत जरांगे पाटील यांनी या उपोषणात पहिल्यांदाच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. गुंडगिरीची साखळी मोडीत काढा. सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय द्या असं म्हणत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यासाठी आपल्याला लढायचं असल्याचंही जरांगे म्हणाले.