अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत 288 मराठा उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुकांच्या स्वप्नांना पालवी फुटली आहे. जिल्ह्यातून 60 ते 70 जणांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, नगरमध्ये सोमवार (दि.12) रोजी जरांगे पाटील यांची शांतता रॅली येणार असून तयारीची लगबग सुरू आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर आणि उपनगरातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक विभागाने सुटी जाहीर केली आहे.
जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी केडगाव येथे 12 वाजता पोहचणार आहे. त्याठिकाणी स्वागत झाल्यानंतर दुपारी 2 वाजता माळीवाडा बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे. शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे सायंकाळी 5 वाजता सांगता होणार आहे. या रॅलीचे सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्थापन करत आहेत.जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत दिले असून राज्यभरातील समर्थकांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी करण्याचे सांगितले आहे. येत्या 29 ऑगस्टला जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड होणार असल्याने नगर जिल्ह्यातूनही सुमारे 60 ते 70 जणांनी तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा असून, या प्रत्येक जागेसाठी प्रत्येकी किमान पाच ते सहा जणांनी तयारी सुरू केली आहे. 29 रोजी ही सारी मंडळी आंतरवली सराटी येथे जाऊन मुलाखती देणार आहेत. या मुलाखतींमध्ये मराठा समाजासाठी आतापर्यंत काय-काय केले, समाजाच्या विकासासाठी काय योगदान दिले, याची माहिती जरांगे पाटलांना देण्याच्यादृष्टीने अहवाल करण्याचे नियोजन सुरू आहे. जरांगे पाटील सोमवारी सकाळी पुण्याहून नगरकडे येणार आहेत. नगरच्या मराठा समाजाच्यावतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल. केडगाव रेल्वे उड्डाणपुलाजवळ नेमाने इस्टेटच्या मैदानावर वाहने लावून रॅली शहरात प्रवेश करेल. शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौपाटी कारंजा येथे रॅलीची सांगता होईल व जरांगे पाटील यांचे भाषण होणार आहे.
पाणी व फूड पॅकेट
नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून हजारो समाजबांधव नगर शहराच्या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पाणी व फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना सेवा व काही सुविधा पुरवायची आहे, त्यांनी रॅली मार्गावर पुरवावी, असे आवाहन अखंड मराठा समाजाने केले आहे.