अंतरवाली सराटी | Antarwali Sarati
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे. या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या सर्व घटनाक्रमानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी आज सकाळी पत्रकार परीषद घेत काही खळबळजनक आरोप केले आहे. मनोज जरांगे म्हणाले की, कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केला आहे की, आपण शांत राहायचे आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचे नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती.
धनंजय मुंडेंचे घेतले नाव
माझी सुपारी देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे असल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला आहे. तर यावेळी त्यांनी कांचन नामक व्यक्तीचे नाव घेतले आहे. ही व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचेही म्हंटले आहे. पुढे ते म्हणाले, याच कांचन नावाच्या व्यक्तीने दोन्ही आरोपींना हाताशी धरून आपल्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती दिली.
धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यामध्ये २० मिनिटांची चर्चा झाली. त्यांनी दोन व्यक्तीला सोबत घेऊन घात करण्याचा प्रयत्न केला. आधी मला बदनाम करण्याचा डाव आखला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर जिवे मारण्याचं ठरवले. पण तेही त्यांना जमले नाही. त्यानंतर त्यांनी औषध, विष द्यायचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. आम्ही सावध असल्याने हे शक्य झाले नाही. मराठ्यांनी शांत राहावे, मी लढायला खंबीर आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगेंनी सांगितला घटनाक्रम
आपल्याला मारण्यासाठी तीन प्रकारची योजना आखण्यात आली होती. यात बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए… हा पीए दोनपैकी एका आरोपीकडे गेला होता. तिथून याची सुरुवात झाली. पहिलं काम ठरलं होतं… खोट्या रेकॉर्डिंग बनवा, व्हिडीओ बनवा, ते द्या. पण त्यांना खरे आणि खोटे कसलेच व्हिडीओ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी खूनच करून टाकायचा प्लॅन केला. मग गोळ्या देऊ… औषध देऊ… मग घातपात करू, असं ठरलं, अशी माहिती जरांगेंनी दिली.
तर छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते. तिथे आरोपींची त्यांची भेट झाली. त्याठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला. मुंडे यांचे हे नपूंसक चाळे आहे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते असा आव्हान त्यांनी दिले. त्यांनी यावेळी मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले.
मराठा समाजातल्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या
या राज्यातल्या मराठा समाजाला माझं सांगणे आहे की, जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. ओबीसीचे नेते, हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या. आज माझ्यावर वेळ आली आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची हे नको. कोणाचे तरी ऐकून एखाद्याच्या जीवावर उठायचे. करणाऱ्या पेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे. आज माझ्यावर बितली उद्या तुमच्यावरही बितू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्या. आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




