Wednesday, February 4, 2026
Homeनगरआता सरकारची गय केली जाणार नाही; शिर्डीत साईचरणी साकडे घालत मनोज जरांगे...

आता सरकारची गय केली जाणार नाही; शिर्डीत साईचरणी साकडे घालत मनोज जरांगे पाटलांचा एल्गार

शिर्डी (प्रतिनिधी)

मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारवर, मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मराठवाड्याच्या जीआर नुसार कामकाज होईल, असे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. समाजाने गेल्या ७०-८० वर्षांपासून संयम राखला असून आता ही शेवटची संधी आहे. मात्र पुन्हा आंदोलनाची वेळ आली तर ती सरकारसाठी कठीण असेल. मग मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

नवीन वर्षाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्यातील जनता सुखी व्हावी आणि बळीराजावरील सर्व संकटे दूर व्हावीत, असे साकडे त्यांनी यावेळी साईचरणी घातले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर सरकारवर कडाडून टीका केली.

YouTube video player

केवळ मराठा आरक्षणच नव्हे, तर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पुण्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत ते म्हणाले, सरकारची चूक असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे ही मोठी शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांची मनस्थिती सध्या भयानक असून मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी माझे पुढील सर्व दौरे रद्द केले असून आता थेट पुण्याला विद्यार्थ्यांना भेटायला जात आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांवर स्वतःची किडनी विकण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, तर ते पूर्णपणे सरकारचे अपयश आहे. बिबट्यांचा वाढता उपद्रव असो किंवा नैसर्गिक आपत्ती, जनतेचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या हातात मतदानाचे शस्त्र आहे. ज्या दिवशी शेतकरी आपल्या कामासाठी मतदान करण्याचे ठरवेल, त्या दिवशी सत्तेचे चित्र बदलेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपल्यावरील टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, मी केवळ समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लढणारा माणूस आहे. माझ्या दारात कोणत्याही जाती-धर्माचा माणूस आला तरी मी त्याचे काम करतो. वंजारी समाजाची अनेक कामे मी रोज मार्गी लावतो. मी जातीवादी असतो, तर मुंडे किंवा गीते यांच्या प्रश्नांत पडलोच नसतो. लोक राजकारणात भरकटतात, पण मला गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यातच रस आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, रमेश चौधरी, सचिन चौगुले, रवींद्र गोंदकर, विलास कोते, सागर जाधव आर्दीसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...