Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange : मनोज जरांगेंनी DCM शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपाची कथित...

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी DCM शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपाची कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; नेमकं काय म्हटलंय?

जालना | Jalna

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते आपल्या नावावर दिल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केला होता. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच लवकरच याबाबत आपण एक ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवू असेही जरांगे म्हणाले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी एक मोठा ‘ऑडिओ बॉम्ब’ फोडला आहे.या कथित ऑडिओ क्लिपची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

- Advertisement -

काय आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये?

विधानसभा निवडणुकीच्या काळातील भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची ही क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भाजपच्या आयटी सेलशी संबंधित एका महिलेचा हिंदीतील संवाद ऐकायला मिळत आहे.क्लिपमधील संदेशानुसार, “जरांगे पाटील यांना आधीच ५०० कोटी रुपये पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत हे पैसे पोहोचवण्यात आले आहेत. आता जरांगे पाटील विधानसभेत आपल्या फायद्याचे राहतील की नाही, याबाबत माझे मत वेगळे आहे” असा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

कथित ऑडिओ क्लिपमधील मुख्य मुद्दे

मराठा व ओबीसी नेत्यांची जुळवाजुळव : जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा पुढाऱ्यांनी आणि ओबीसी नेत्यांनी बोलले पाहिजे. उदयनराजे भोसले, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांनी जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी चर्चा यात होत आहे.

जरांगे यांना ‘डॅमेज’ करण्याची रणनिती : “आपल्या हाताने करायचं नसेल, तर दुसऱ्याच्या हाताने करू. पार्टी फंड वापरायचा नसेल, तर वैयक्तिक खर्च करा. त्याला नाही आवरलं तर तो मराठवाड्यात अक्षरशः गिळून घेईल,” असा सल्ला एका व्यक्तीने दिला असल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते.

नेत्यांची भीती आणि गटबांधणी : पक्षातील अनेकजण मतांच्या भीतीने आणि विधानसभा निवडणुकीच्या चिंतेमुळे उघडपणे बोलायला तयार नसल्याची खंत एका व्यक्तीने व्यक्त केली आहे. मात्र, मराठवाड्यातील जरांगे-विरोधी लोकांना जवळ करून त्यांच्यामार्फत विरोध करण्याचे नियोजन या क्लिपमध्ये बोलले जात आहे.

इतर मुद्द्यांवर भर : जरांगे यांच्याव्यतिरिक्त देशाची आर्थिक स्थिती आणि राहुल गांधी यांच्याबाबत अर्णव गोस्वामी यांचे व्हिडिओ लोकांसमोर आणून नरेटिव्ह तयार करण्याबाबतही या संभाषणात चर्चा झाल्याचे दिसत आहे.

मनोज जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर नेमके आरोप काय?

दसरा मेळाव्यातून (Dasara Melava) आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता. “एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते मला दिल्याची कुजबूज भाजप नेत्यांमध्ये सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या हाताने ५०० कोटी रुपये माझ्यापर्यंत पोहोचले आणि मी तुमचा ‘थर्ड पर्सन’ आहे, असं तुम्ही भाजप नेत्यांना सांगितलं का?” असा सवाल करत जरांगे यांनी शिंदेंना पुरावे देण्याचे आव्हान दिले आहे. तसेच, मी जर उद्या मराठ्यांना १०० रुपये टाकायला सांगितले, तर माझ्याकडे अडीच हजार कोटी जमा होतील,” असे सांगत जरांगे यांनी पुढील संघर्षाचा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदेंनी सर्व आरोप फेटाळले

मनोज जरांगे यांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “मी कोणाकडूनही ५०० कोटी रुपये घेतले नाहीत आणि कोणाला दिलेही नाहीत,” असे स्पष्ट करत शिंदेंनी जरांगेंचे दावे खोडून काढले. तसेच, जरांगे पाटील यांनी शहानिशा करूनच बोलावे आणि त्यांच्याकडे कोणतेही पुरावे असतील तर ते सादर करावेत, म्हणजे चौकशी होऊन ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असे प्रत्युत्तर शिंदेंनी दिले आहे.

ताज्या बातम्या

चंद्रशेखर

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपावरून नवा दावा केला...