मुंबई । Mumbai
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत सुरू असून, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयात मराठा आंदोलनावर झालेल्या सुनावणीनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आमचं आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आहे. आम्ही नेहमीच लोकशाही, कायदा आणि न्यायालयाचा आदर करतो.” सरकार जरी गरीब मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असले तरी, न्यायव्यवस्था नक्कीच न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सरकार गरिबांना विचारत नसेल, तर त्यांची काळजी घेण्यासाठी न्यायालय आहे. न्यायदेवता आपल्या वेदनेत सहभागी होऊन गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करेल,” असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला. “जर सरकारने आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.” सातारा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सिद्ध झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. “मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्धाराची पुनरुक्ती केली. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मराठे काय असतात, हे साडेतीनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा बघायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
न्यायालयाने रस्त्यावरील वाहने काढण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्याचे पालन केले, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. “रात्री रस्त्यावरील सर्व वाहने काढण्यात आली आणि आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाही. आम्ही यापुढेही न्यायालयाचे प्रत्येक आदेश पाळू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सरकारवर मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोपही केला. “तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात यायचे आहे, त्यामुळे मराठ्यांचा प्रश्न सोडवा. उगाच आम्हाला आझाद मैदानावरून किंवा मुंबईतून हाकलून देण्याच्या वल्गना करू नका. अन्यथा, साडेतीनशे वर्षांनंतर मराठे काय असतात, हे पुन्हा कळेल,” असे म्हणत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.




