मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार प्रदीर्घ काळापासून आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाही हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर मनोज कुमार १० वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरीत झाले.
भारत कुमार म्हणून ओळख
मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी विशेष ओळखले जात. त्यामुळे त्यांना ‘भारत कुमार’ हे विशेष टोपणनाव मिळाले. त्यांनी आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटवला.
मनोज कुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणूनही आपले कौशल्य सिद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले.
मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा १९६४ मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.
हे चित्रपट ठरले सर्वोत्कृष्ट
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचे तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते.
१९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाने त्यांना सर्वात मोठे यश मिळाले, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. ‘हरियाली और रास्ता’, ‘शादी’ (१९६२) च्या यशानंतर ‘डॉ. विद्या (१९६२) आणि गृहस्थी (१९६३), या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा