Wednesday, September 11, 2024
Homeनगरमानोरी येथील चोरीच्या घटनेतील आरोपी जेरबंद

मानोरी येथील चोरीच्या घटनेतील आरोपी जेरबंद

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी येथे शनिवार 21 ऑक्टोबर रोजी वृध्द महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून तिला मारहाण करून सुमारे चार तोळ्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्यांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील लक्ष्मण खामकर हे त्यांची पत्नी, मुलगी आणि स्वतः पारनेर येथे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई सरुबई खामकर एकट्याच असल्याचा गैरफायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी बंगल्याची बेल वाजवून सीसीटिव्ही कॅमेरा दुरूस्त करण्यास आलो आहे असे सांगून घरात प्रवेश करून वृद्ध सरूबाई यांना गंभीर मारहाण केली. सदर मारहाणीत सरूबाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर आरोपींनी गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन भामट्यांनी तेथून धूम ठोकली.

या घटनेचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ सुरू करून काही तांत्रिक विश्लेषणाच्या व नागरिकांच्या दिलेल्या महितीवरून कोल्हार येथील रोहित एकनाथ कानडे (वय 24) व गणेश सुनील लोंढे (वय 22) रा. चिंचोली फाटा या तरुणांनीच सदर जबरी चोरी केल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक कटारे, पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके व सचिन ताजणे यांनी आरोपीस चिंचोली फाटा व श्रीरामपूर येथून शिताफीने ताब्यात घेतले.

हे आरोपी या वृध्द महिलेच्या नात्यातीलच असल्याचे समजते. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कटारे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या