Sunday, September 29, 2024
HomeनाशिकMansoon Session : सभागृहात चर्चेची तयारी ठेवा!

Mansoon Session : सभागृहात चर्चेची तयारी ठेवा!

सत्ताधारी पक्षाचे विरोधकांना आव्हान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हान बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना देण्यात आले. सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा आणि खोट्या नॅरेटिव्हचा पर्दाफाश करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सत्ताधारी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार घालताना सरकारला पत्र लिहिले. या पत्राच्या माध्यमातून विरोधी पक्षाने सरकारवर विविध आरोप केले आहेत. या आरोपांचा समाचार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या विरोधी पक्षाला क्षणिक आनंद मिळाला. पण १५ वर्षानंतर काँग्रेसला लोकसभेत ९९ जागा मिळाल्या. ४०, ५० आणि ९९ अशा जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला २४० पर्यंत पोहचायला आणखी २५ वर्ष लागतील, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. संविधान बदलणार असे खोटे कथानक तयार करून लोकांची दिशाभूल करून मते मिळवली. त्याने क्षणिक आनंद मिळाला. आम्ही उबाठा गटासमोर १३ जागांवर लढलो आणि त्यापैकी सात जागा आम्ही जिंकल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेले यश ही तात्पुरती सूज आहे आणि ती विधानसभा निवडणुकीत लवकरच उतरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेपैकी १२० एकर जागेवर सेंट्रल पार्क तयार करण्यात येणार आहे. मुंबई किनारा मार्गाची १८० एकर आणि रेसकोर्सची १२० एकर अशा एकूण ३०० एकर जागेवर अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क तयार करणार असल्याची माहिती शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. दरम्यान, चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात निरोप द्यायला सभागृहात येणार कि तो फेसबुक लाईव्ह करून द्याल. निरोप द्यायचा की नाही द्यायचा हे जनता जनार्दनाच्या हातात असते, असा टोला शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

घोटाळे विसरलात काय?
सत्ताधारी पक्षावर विविध घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील बॉडीबॅग घोटाळा, कोविड घोटाळा, खिचडी घोटाळा अशा विविध घोटाळ्यांची आठवण करून देत हे घोटाळे विसरलात काय? असा सवाल केला. विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा देताना फडणवीस यांनी विरोधकांनी खोटे नेरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी उघडली असून तिचा पर्दाफाश अधिवेशनात करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत खोटे नॅरेटिव्ह तयार करून मते मिळाल्यानंतर आता खोटे बोलण्याच्या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला आहे. त्यामुळे पत्रात आरोप करताना विरोधी पक्षाने आरशात आपला चेहरा पहिला पाहिजे. महाविकास आघाडीला विदर्भातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पेपर फुटले. त्यामुळे त्यांनी पेपरफुटीवर बोलू नये, असे फडणवीस यांनी बजावले.

मनुस्मृतीला महाराष्ट्रात स्थान नाही : अजित पवार
विरोधी पक्षाने दिलेल्या पत्रात मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख केला आहे. पण मनुस्मृतीतील कुठल्याही प्रकारचा श्लोक शाळेच्या पुस्तकात नाही. विरोधी पक्षाने याबाबतचा मुद्दा उठविण्याची गरजच नव्हती. हा शाहू,फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मनुस्मृतीला आमचे समर्थन नाही, त्यामुळे महाराष्ट्र्रात मनुस्मृतीला स्थान असणार नाही. जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा हा प्रकार असून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आमचे कधीच याला समर्थन नाही उलट विरोधच आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या